Sanakarshan Karhade Shares Special Post For Prashant Damle : टीव्ही, सिनेमा व नाटक… मनोरंजनाच्या तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणारे लोकप्रिय अभिनेते म्हणजे प्रशांत दामले. तब्बल तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी स्वतःला रंगभूमीला वाहून घेतलं आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आजही त्यांच्या नाटकांना ‘हाऊसफुल्ल’चे बोर्ड लागतात. असा हा रंगकर्मी त्यांचा नाटकाचा वैयक्तिक १३ हजार ३०० वा प्रयोग सादर करणार आहे.

प्रशांत दामलेंच्या या १३ हजार ३०० व्या प्रयोगानिमित्त अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने त्यांच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्याने प्रशांत दामलेंचे कौतुक केले आहे. तसेच आजवरच्या प्रवासाबद्दल संकर्षणने त्यांच्या मेहनतीला दादही दिली आहे. त्याचबरोबर संकर्षणने प्रशांत दामलेंना १३ हजार ३०० व्या प्रयोगासाठी खास शुभेच्छादेखील दिल्या आहेत.

या पोस्टमध्ये संकर्षण म्हणतो, “आज आमच्या दामलेसरांचा वैयक्तिक १३ हजार ३०० वा प्रयोग आहे… ‘ते रा ह जा र ती न शे’ वा प्रयोग… म्हणजे काय झाले हो? एका प्रयोगाचे तीन तास जरी म्हणलं तरी आयुष्याचे ३९ हजार ९०० तास हा माणूस स्टेजवर आहे आणि तेही त्याच ऊर्जेने. आता तुम्ही म्हणाल व्यवसाय आहे त्यांचा… त्याचे त्यांना पैसे मिळतात; मान्यच आहे.”

पुढे संकर्षण असा म्हणतो, “३८ वर्षं कुठल्याही व्यवसायात किंवा मनोरंजनाच्या व्यवसायात कधीही कंबरेखालचे विनोद न करता, नाटकाशी, नाटकाला आलेल्या प्रेक्षकांशी प्रामाणिक राहून काम करणं सोप्पं नाही हो… नट म्हणून समोरच्या नटाचा विनोद न मारता, त्याचाही हुरूप वाढवणं, समोरच्या नटाच्या विनोदालाही मोठं करणं फार फार अवघड आहे. तसेच निर्माता म्हणून तरुण पोरांच्या पाठीशी उभं राहणं हेही सोप्पं नाही.”

यापुढे तो असं म्हणतो, “माणूस म्हणून पडत्या काळात रंगमंच कामगारांचं स्वखर्चानं घर भरणं हे तर त्याहून सोपं काम नाही. महाराष्ट्र नाही भारतभर; भारत नाही तर, जगभर जिथे जिथे मराठी लोक राहतात तिथे तिथे जाऊन प्रयोग करणं, तिथल्या माणसांना नाटकाशी जोडून ठेवणं किती अवघड आहे.”

त्यानंतर संकर्षणने स्वत:चा अनुभव शेअर करीत म्हटले, “मी या क्षेत्रात फारच नवा आहे. पण लाखो किलोमीटरचा प्रवास, जागरणं करून न थकता, नं कंटाळता एका प्रयोगात ३ तास फ्रेश दिसणं कित्ती अवघड आहे हे मला कळलंय. पण, हा माणूस वयाच्या ६४ व्या वर्षी आम्हाला लाजवेल असा उभा आहे; हे कमाल आहे. माणूस नसताना त्याची किंमत करण्यापेक्षा तो असताना त्याचं मोल कळणं फार आवश्यक असतं.”

कर्षण कऱ्हाडे इन्स्टाग्राम पोस्ट

त्यानंतर संकर्षण प्रशांत दामलेंचे कौतुक करीत म्हणाला, “तीन पिढ्यांचं रंगमंचावरून मनोरंजन करणारं हे मराठी वैभव आपल्या महाराष्ट्रात आहे आणि हे आपणच मिरवणं फार महत्त्वाचं आहे नाही का? प्रशांत दामले सर खूप खूप शुभेच्छा… तुम्ही फार मौल्यवान आहात.” दरम्यान, संकर्षणने शेअर केलेल्या या पोस्टवर अनेक कलाकारांनीही प्रतिक्रिया व्यक्त करीत प्रशांत दामलेंचे कौतुक केले आहे आणि त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.