दि नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए) आपला विख्यात मराठी नाट्य महोत्सव ‘प्रतिबिंब – मराठी कथांसाठी एक व्यासपीठ’ पुन्हा सुरू होत आहे. ४ वर्षांच्या प्रदीर्घ खंडानंतर प्रतिबिंब आजपासून आपल्या ९व्या आवृत्तीसह रंगमंचावर परत येत आहे. ३ दिवस चालणाऱ्या या महोत्सवात मराठी नाट्यसमुदायातील काही नामवंतांच्या कलाकृतींचे सादरीकरण केले जाईल.

या महोत्सवाची सुरुवात २० मे २०२२ पासून ‘अध्यात मी सध्यात तू मध्यात म कुणी नाही’ या मराठी नाटकाने होणार आहे. हे नाटक एक अस्तित्वाच्या संकटाचा उत्तर-आधुनिक विचार आहे, जिथे दोन तरुण त्यांच्या जीवनाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतात असं या नाटकाचं कथानक आहे. हे नाटक तुम्हाला पौराणिक कथा, वेदना आणि अराजक अशा विविध पैलूंमधून घेऊन जाते.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच २१ मे २०२२ रोजी या महोत्सवात प्रख्यात मराठी लेखक आणि विनोदकार पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, (पु. ल. देशपांडे) यांच्या विनोदी आणि समीक्षात्मक कार्याचे सादरीकरण होईल. ‘अपरिचित पु लं’ असं योग्य नाव असलेला हा कार्यक्रम त्यांच्या ‘खोगीर भरती’, ‘अघळ पघळ’, ‘हसवणूक’, ‘गाठोडं’, ‘उरलंसुरलं’ यासारख्या कमी ज्ञात कलाकृतींवर आधारित आहे. शिवाय, त्यांच्या काही कविताही संगीत रचना म्हणून सादर केल्या जातील. त्याचदिवशी प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित मुंबईचे कावळे नावाची आणखी एक विचारप्रवर्तक कॉमेडी सादर केली जाईल, जे शफात खान यांनी ४० वर्षांपूर्वी लिहिलेले तरी आजच्या परिस्थितीवरील एक व्यंगात्मक चित्रण आहे. या नाटकात अनिल बाबुराव शिंदे, हृषीकेश शेलार, संतोष सरवदे, विक्रांत कोळपे, सुशांत कुंभार आणि प्रशांत पलाटे या कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.

आणखी वाचा- अमिताभ बच्चन- शाहरुख खानसह अन्य २ अभिनेत्यांच्या विरोधात खटला दाखल, वाचा नेमकं काय घडलं

या महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी ‘थिएटर कट्टा’ हे सादरीकरण प्रेक्षकांना पाहायला मिळेल, जिथे मराठी रंगभूमीचे तीन दिग्गज – सतीश आळेकर, चंद्रकांत काळे आणि विजय केंकरे – एकत्र येऊन त्यांच्या आवडी, प्रक्रिया, नाटके आणि रंगभूमीवरील एकूणच सर्व गोष्टींवर चर्चा करतील. ‘संगीत देवबाभळी’ या नाटकाने या महोत्सवाची आध्यात्मिक सांगता होईल. संत तुकारामांच्या जुन्या आणि नवीन अभंगांचा समावेश असलेल्या या नाटकातील भावपूर्ण संगीतमय प्रवास, प्रेक्षकांना आध्यात्मिक जगाची अनुभूती देईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या महोत्सवाबद्दल बोलताना श्री ब्रूस गुथरी, एनसीपीएमधील थिएटर आणि फिल्म्सचे प्रमुख, म्हणाले, “जेव्हा मी एनसीपीए मध्ये सुरुवात केली तेव्हा मराठी रंगभूमी आणि महाराष्ट्र व भारतातील कला आणि संस्कृतीच्या वाढीसाठी मराठी रंगभूमीने दिलेले योगदान हे थिएटर समुदायासोबतच्या आमच्या संभाषणाच्या केंद्रस्थानी होते. काही दिग्गज साहित्यकृतींना ओळखून त्यांना पुनरुज्जीवित करण्याचा एक मार्ग म्हणून प्रतिबिंबची संकल्पना मांडण्यात आली होती. एनसीपीएमध्ये हा महोत्सव पुन्हा सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. प्रतिबिंबद्वारे आम्ही या कार्यासाठी दारे खुली करण्यास उत्सुक आहोत. आपल्या सभोवतालच्या जगाला नवीन उजेडात मांडणाऱ्या विचारप्रवर्तक विषयांसाठी ओळखल्या जाणाऱ्या मराठी रंगभूमीची चैतन्यशील परंपरा प्रेक्षकांनी अनुभवावी अशी आमची इच्छा आहे.”