बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक अभिनेत्री म्हणजे प्रिती झिंटा. बॉलिवूडची ‘डिंपल गर्ल’ म्हणून तिला ओळखले जाते. प्रिती झिंटा हिने आपल्या दमदार अभिनयाने आणि परफॉर्मन्सने बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. सध्या प्रिती ही मातृत्वाचा आनंद घेताना दिसत आहे. प्रिती झिंटाने ३१ जानेवारीला तिचा ४७ वा वाढदिवस साजरा केला. मात्र हा वाढदिवस तिने फार वेगळ्या पद्धतीने साजरा केला. यावेळी तिने जॉगर्स घालून केक कापतानाचे फोटो शेअर केले आहेत.
प्रिती झिंटाने नुकतंच इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. यावेळी तिच्यासोबत जीन गुडइनफ दिसत आहे. जीन तिला केक भरवत असून प्रितीने यावेळी भगव्या रंगाचे जॉगर्स परिधान केले आहेत. यावेळी तिच्यासोबत कुटुंबातील अनेकजण दिसत आहे. हे फोटो पोस्ट करत तिने याला खास कॅप्शन दिले आहे. तसेच यावेळी तिने वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी कपडे न बदलता आल्याची खंतही व्यक्त केली आहे.
प्रितीने वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी चाहत्यांचे आभार मानले आहे. त्यावेळी ती म्हणाली की, “मला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि प्रेम पाठवल्याबद्दल सर्वांचे आभार. हा वाढदिवस इतर वाढदिवसासारखा नव्हता. आम्ही पूर्णवेळ घरीच होतो आणि बहुतांश वेळ हा मुलांच्या दुधाच्या बाटल्या स्वच्छ करण्यात आणि निर्जंतुक करण्यात घालवला. त्यांना खायला घालण्यात, त्यांची नॅपी चेंज करण्यात बराच वेळ निघून गेला.”
“मी तुम्हाला हे सगळं सांगतोय यावर माझा विश्वासच बसत नाही. कारण मला छान कपडे घालण्यासाठी आणि थोडंस ग्रूमिंग करायलाही वेळ मिळाला नाही. पण असं असलं तरी हा वाढदिवस फार खास होता. कारण माझी लहान मुलं माझ्यासोबत होती आणि ती फक्त कौटुंबिक बाब होती,” असे प्रिती म्हणाली.
वाढदिवस साजरा करताना वडिलांच्या आठवणीत सायली संजीव झाली भावूक, म्हणाली…
दरम्यान प्रीति झिंटाने तिच्यापेक्षा १० वर्षांनी लहान जीन गुडइनफसोबत गुपचूप लग्न केले. २९ फेब्रुवारी २०१६ रोजी लॉस एंजलसमध्ये अगदी खाजगी सोहळा करत तिने हे लग्न केलं. प्रीति आणि जीनने अतिशय गुपचूप लग्न केलं होतं. त्यांच्या वेडिंगचे फोटो जवळपास सहा महिन्यांनी मीडिया समोर आले होते. आता लग्नाच्या जवळपास पाच वर्षांनंतर प्रीति आई झाली. तिला सरोगसीद्वारे जुळ्याची मुले झाली आहेत. त्या दोघांची नावे जय आणि जिया अशी आहेत.