२०१६ मध्ये ‘लिटील थिंग्स’ (Little things) ही वेब सीरिज यूट्यूबवर प्रदर्शित झाली होती. पाच भागांची ही छोटी वेबसीरिज खूप लोकप्रिय झाली होती. याच काळात मिथिला पालकरचे कप साँग व्हायरल झाले होते. मिथिला आणि ध्रुव सेहगल यांच्या या वेब सीरिजला लोकांनी खूप प्रेम मिळाले होते. लिटील थिंग्सच्या पहिल्या सीझनची निर्मिती डाईस मीडियाने केली होती. यूट्यूबवर उपलब्ध असलेल्या या वेब सीरिजच्या पहिल्या सीझनला मिळालेल्या प्रसिद्धीमुळे निर्मात्यांनी या कार्यक्रमाचे पुढचे सीझन्स तयार करण्याचा निर्णय घेतला.
‘लिटील थिंग्स’ या वेब सीरिजची कथा काव्या आणि ध्रुव या दोन पात्रांभोवती फिरते. पहिल्या सीझनला मिळालेल्या यशामुळे नेटफ्लिक्सने या शोच्या पुढच्या सीझन्सची निर्मिती करायचे ठरवले. आतापर्यंत या वेब सीरिजचे चार सीझन प्रदर्शित झाले आहेत. पहिल्या सीझनमध्ये ध्रुव-काव्या या लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या जोडप्याची ओळख करुन दिली होती. दुसऱ्या आणि तिसऱ्या सीझनमध्ये या तरुण जोडप्याला एकत्र राहताना काय अडचणी येतात आणि त्या अडचणींवर ते मिळून कशी मात करतात हे दाखवण्यात आले. त्यानंतर आलेल्या चौथ्या सीझनचा शेवट काव्या आणि ध्रुवच्या साखरपुड्याने झाला होता. दरम्यान शो संपल्याचे स्पष्ट असतानाच लिटील थिंग्सच्या चाहत्यांसाठी एक खास माहिती समोर आली आहे.
चार यशस्वी सीझन्सनंतर या सीरिजचा शेवट झाला असल्याची माहिती निर्मात्यांनी दिली होती. त्यामुळे लिटील थिंग्सचा नवा सीझन येणार नसल्याचे स्पष्ट झाले होते. नुकतंच मिथिला आणि ध्रुवने त्यांच्या या लोकप्रिय वेब सीरिजचा प्रिक्वल येणार असल्याचे सांगितले. लिटील थिंग्सचा हा प्रिक्वल ऑडिओ स्वरुपामध्ये असणार असून तो ‘ऑडिबल’ या साईटवर प्रदर्शित होणार आहे. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये ध्रुव सेहगल म्हणाला की, “हा शो प्रत्येकासाठी वेगळा असला, तरी तो प्रत्येकासाठी आपलासा वाटतो. लिटील थिंग्सच्या या ऑडिओ स्वरुपामधल्या प्रिक्वलमध्ये तुम्हाला ध्रुव आणि काव्या यांची भेट कशी झाली हे ऐकायला मिळेल. आधीची तीच गोष्ट वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. त्यामुळे ऐकू येणाऱ्या गोष्टीची कल्पना तुम्ही स्वत: करु शकाल. तुमच्या कल्पनेतली ध्रुव-काव्याची भेट तुम्ही तुमच्या हिशोबाने अनुभवू शकाल.”
ध्रुव सेहगल या लिटील थिंग्समध्ये काम करण्यासोबतच त्याने या वेब सीरिजचे लेखण देखील केले आहे.