‘पीके’ आणि ‘मुन्नाभाई’ यांसारखे हिट सिनेमे दिल्यानंतर दिग्दर्शक राजकुमार हिरानी लवकरच अभिनेता संजय दत्त याच्यावर चरित्रपट बनवणार आहे. या चरित्रपटात रणबीर कपूर, संजय दत्तची भूमिका साकारणार आहे. पण आता प्रिया दत्त यांनी स्पष्ट केले आहे की या चरित्रपटात त्यांची कोणतीही भूमिका असणार नाही.

सध्या बॉलिवूडमध्ये चरित्रपट बनवण्यालाच अधिक प्राधान्य दिले जात आहे. जेव्हा संजय दत्तच्या आयुष्यावर चरित्रपट बनणार ही बातमी कळली, तेव्हा त्याच्या चाहत्यांना कमालीचा आनंद झाला. संजय दत्तचे आयुष्य अनेक उतार- चढावांनी भरलेले आहे. या चरित्रपटाबद्दल संजय दत्तची बहिण प्रिया दत्त यांनी आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, या सिनेमात माझा सहभाग एवढा महत्त्वपूर्ण नाही. या सिनेमाच्या दिग्दर्शकांना बरोबर माहीत आहे आणि मला विश्वास आहे की जे ते करतील ते चांगलेच असेल. प्रिया यांच्या या वक्तव्यावरुन हे स्पष्ट झाले आहे की त्यांचा राजू हिरानी यांच्या दिग्दर्शनावर पूर्ण विश्वास आहे.

दरम्यान, संजय दत्त आणि ऋषी कपूर यांच्यातील वाद टोकाला जाण्याची परिस्थिती निर्माण झाल्याच्या घटनेला बॉलिवूडमध्ये नेहमीच खलनायकाची भूमिकेत दिसणाऱ्या ग्रोवर यांनी उजाळा दिला आहे. टीना मुनीमसोबतच्या प्रेम प्रकरणा दरम्यान संजय दत्तच्या मनात ऋषी कपूर यांच्याबद्दल राग निर्माण झाल्याची घटना गुलशन ग्रोव्हरने डिएनएला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितली होती. अविवाहित ऋषी कपूर टीनाच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत आहेत, असे संजय दत्तला वाटत असल्यामुळे संजू बाबाने टोकाचा विचार केला होता, असे ग्रोवर यावेळी म्हणाला होते.

संजय दत्त आणि टिना मुनीम यांच्यात प्रेम प्रकरण सुरू होते. त्यावेळी ऋषी कपूर यांच लग्न झाले नव्हते. संजय दत्त याला संशय होता की, ऋषी कपूर हे टीनाच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत आहे, असे गुलशन ग्रोवर यांनी डिएनएला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले. ते म्हणाले की, मी आणि संजय भावांसारखे होतो. संजय दत्तने मला सांगितले की, ऋषी कपूरला धडा शिकवायचा आहे. त्यानुसार ऋषी कपूरला मारण्यासाठी आम्ही दोघेही ऋषी कपूरच्या घरी गेलो. पण ॠषी कपूरला मारण्याआधी नितू आम्हाला भेटली आणि तिने ऋषी कपूर आणि टीना यांच्यामध्ये कोणतेही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे संजूबाबाचा राग निवळला आणि मोठा अनर्थ टळला. त्यानंतर काही दिवसांनी ऋषी कपूर आणि नितू विवाहबंधनात अडकले होते.