बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री म्हणून प्रियांका चोप्राला ओळखले जाते. ती नेहमी सामाजिक स्तरांवरील विविध विषयांबद्दल भाष्य करत असते. काही दिवसांपूर्वी प्रियांकाने संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित केले. यावेळी तिने तिच्या भाषणादरम्यान जगभरातील विविध विषयांवर भाष्य केले. याचे काही फोटो आणि व्हिडीओही प्रियांकाने शेअर केले आहेत. ‘हल्ली जगात सर्व काही ठिक चालेलं नाही’, असे प्रियांका चोप्राने म्हटले. यामुळे सध्या ती चांगलीच चर्चेत आली आहे.

प्रियांका चोप्राने न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्र महासभेतील काही फोटो शेअर केले आहेत. यात तिने UNGA मधील शाश्वत विकास उद्दिष्टे (SDG) क्षणाचे अनेक व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत. यातील एका फोटोत प्रियांकाने वेनेसा नकातेसोबत पोज दिली. तर इतर फोटोत तिच्यासोबत मलाला युसुफ, अमांडा गोरमन, सोमाया फारुकी आणि ज्युडिथ हिल यांच्यासोबत पोज देताना दिसत आहे. सध्या तिच्या भाषणाचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.
आणखी वाचा : “मी भारतात…” प्रियांका चोप्राने सांगितला हॉलिवूडमध्ये काम करण्याचा अनुभव

ती म्हणाली, “आज आपण सर्वजण एका अशा महत्त्वपूर्ण टप्प्यावर भेटलो आहोत, जिथे जागतिक एकता ही नेहमीपेक्षा अधिक महत्त्वाची आहे. सध्या जग हे हवामानातील बदल आणि कोव्हिड १९ या साथीच्या रोगाचा सामना करत आहे. आधीच जगाला संघर्ष, द्वेष, गरिबी, उपासमार आणि असमानता यासारख्या चिंता सतावत आहेत, त्यामुळे जगात सर्व काही ठीक नाही. पण ही संकटे अचानक आलेली नाहीत आणि योग्य योजना आखून त्या संकटांवर मात करता येईल. ती योजना युनायटेड नेशन्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स यांच्याकडे आहे.”

आणखी वाचा : प्रियांका चोप्रा आणि निक जोनसने बाळासाठी सरोगसीचा पर्याय का निवडला? समोर आले कारण

“मी भारतात लहानाची मोठी झाली आहे. भारतात जगातील इतर अनेक भागांप्रमाणेच अनेक मुलींना शिक्षणाचा हक्क मिळवणे हे आव्हान वाटते. एकीकडे मुलांना शिकायचे असते कारण त्यांच्या ती प्रबळ इच्छा असते. तर दुसरीकडे त्यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत. पण माझा विश्वास आहे की शिक्षण म्हणजे समता, सामाजिक न्याय, सामाजिक परिवर्तन आणि लोकशाहीचा आधार आहे. त्यामुळे ही समस्या लवकर दूर होईल”, असे प्रियांकाने म्हटले.

दरम्यान प्रियांकाने या परिषदेत जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. यावेळी तिने फक्त शिक्षण किवा कोव्हिड नव्हे तर अनेक सामाजिक विषयांवर तिचे मत मांडले. तिचे हे वक्तव्य सध्या चांगलेच चर्चेत आहे. तसेच सध्या सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.