अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्येही चांगलीच नावाजली जात आहे. ‘क्वांटिको’ या सिरीजच्या निमित्ताने प्रियांकाने आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचत प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. या मालिकेच्या पहिल्या पर्वानंतर आता पुन्हा एकदा प्रियांका ‘क्वांटिको’च्या दुसऱ्या भागाच्या चित्रिकरणात व्यग्र आहे. या सिरीजसोबतच ती चर्चेत आहे ते म्हणजे आभिनेता ड्वेन जॉन्सनसोबतच्या तिच्या आगामी चित्रपटामुळे. ‘बेवॉच’ या आगामी चित्रपटाद्वारे ही देसी गर्ल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सर्व गोतावळ्यामध्ये प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या प्रियांकाचे नाव बऱ्याच अभिनेत्यांसोबतही जोडले जात आहे. त्यातीलच एक अभिनेता म्हणजे टॉम हिडलस्टन.
२०१६ मध्ये लॉस एंजेलिस येथे पार पडलेल्या ‘एमी अवॉर्ड्स’ मध्ये लाल रंगाच्या गाऊनमध्ये रेड कार्पेटवर उतरलेल्या प्रियांकावरच अनेकांच्या नजरा खिळल्या होत्या. या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये टॉम हिडलस्टन या अभिनेत्यासह व्यासपीठावर आलेल्या प्रियांकाने चाहत्यांसह टॉमच्याही मनावर जादू केली. पण, या पुरस्कार सोहळ्यानंतर टॉम आणि प्रियांकाविषयीच्या बऱ्याच चर्चा चित्रपटवर्तुळात रंगू लागल्या. प्रियांका टॉमला फक्त दहा मिनिटांसाठी भेटली होती आणि माध्यमांमध्ये हे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. या सर्व चर्चा आणि कुतुहलपूर्ण प्रश्नांना प्रियांकाने कॉफी विथ करण या चॅट शोमध्ये उत्तरे दिली आहेत.
भारत आणि अमेरिकेतील प्रसारमाध्यमांविषयी भाष्य करण्यासंबंधीचा प्रश्न ज्यावेळी विचारण्यात आला त्यावेळी प्रियांकाने याबाबतचा खुलासा केला. प्रसारमाध्यमं आणि टॉम हिडलस्टनविषयी प्रश्न विचारला असता प्रियांका म्हणाली, ‘एमी पुरस्कार सोहळ्यादरम्यान मी टॉम हिडलस्टनसोबत पुरस्कार सादर करण्यासाठी गेले होते. मी त्याला फक्त दहा मिनिटांसाठीच भेटले होते. पण, त्या ठिकाणी (अमेरिकेत) टॅबलॉइडचं बरंच घातक प्रस्थ आहे. मी फक्त दहा मिनिटांसाठी कोणालातरी भेटले आणि जागतिक स्तरावर त्याची चक्क बातमी होऊन गेली.’ प्रियांकाने दिलेले हे उत्तर सर्वांनाच पटले आहे असे नाही. त्यामुळे या प्रश्नाला उत्तर देत असताना प्रियांकाने काहीशी सारवासारव केली आहे असे अनेकांचेच म्हणणे आहे.
काही दिवसांपूर्वी भारतात आलेल्या प्रियांकाने करण जोहरच्या कॉफी विथ करण या चॅट शो मध्ये हजेरी लावली होती. भारत दौऱ्यावरुन पुन्हा क्वांटिकोच्या चित्रिकरणासाठी सेटवर पोहोचलेल्या प्रियांकाचा सेटवरच एक अपघात झाला होता. त्यामुळे, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही दिवसांच्या विश्रांतीनंतर ही ‘देसी गर्ल’ पुन्हा एकदा मोठ्या उत्साहाने तिच्या कामावर रुजु झाली आहे. ‘क्वांटिको’ या सिरीजची लोकप्रियता आणि प्रियांकाच्या नावाभोवती असणारे प्रसिद्धीचे वलय पाहता प्रियांका हॉलिवूड आणि आंतरराष्ट्रीय मनोरंजन विश्वात नावाजली जात आहे. प्रियांकाने दुसऱ्यांदा हा अवॉर्ड मिळवला असून तिने या पुरस्कारासाठीच्या शर्यतीत अॅलेन पॉम्पेओ, केरी वॉशिंग्टन, ताराजी पी. हॅन्सन, विओला डेविस या अभिनेत्रींना मागे टाकले आहे. पीपल्स चॉईस अवॉर्ड्स २०१७ या पुरस्कार सोहळ्यामध्ये प्रियांकाला ‘फेव्हरिट ड्रामॅटिक टिव्ही अॅक्ट्रेस’ या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.