गेल्या काही दिवसांपासून अनेक हिंदी, मराठी, दाक्षिणात्य चित्रपट प्रदर्शित होताना दिसत आहे. अनेक चित्रपटांची एकमेकांशी स्पर्धा पाहायला मिळत आहे. पांडू, पावनखिंड, चंद्रमुखी, शेर शिवराज या अनेक चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तसेच अनेक समीक्षक या चित्रपटाची स्तुती करताना दिसत आहे. पण अनेक चित्रपटांना प्राईम टाईम न मिळाल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. मराठीतील अनेक कलाकार यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहे. नुकतंच प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महेश टिळेकर हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. नुकतंच त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांनी चित्रपटागृहातील रिकाम्या खुर्च्या दिसत आहे. त्यासोबत त्यांनी कॅप्शन देताना मराठी प्रेक्षक गेले कुठे? असा प्रश्नही विचारला आहे.

“एक प्रेक्षक म्हणून…”, ‘चंद्रमुखी’ चित्रपट पाहिल्यानंतर अमृता खानविलकरच्या पतीची पहिली प्रतिक्रिया

महेश टिळेकर यांची फेसबुक पोस्ट

“मराठी प्रेक्षक गेले कुठे?

प्रदर्शनाआधी भरपूर प्रसिद्धी करून सिनेमाची हवा करण्यात आलेला आणि नुकताच प्रदर्शित झालेला एक मराठी चित्रपट मी रीलिजच्या पहिल्या दिवशीच थिएटर मध्ये जाऊन पाहिला. त्यावेळी साधारण शंभर एक प्रेक्षक होते. वाटलं आज पहिला दिवस असल्यामुळे कदाचित प्रेक्षक कमी असतील.पण चित्रपट प्रदर्शित होऊन काही दिवस झाले तसे या चित्रपटात काम केलेल्या प्रसिद्ध कलाकारांनी आपापल्या सोशल मीडियावर पोस्ट टाकून आणि डिजिटल मीडिया ने सातत्याने बातम्या मधून या सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत असून करोडो रुपयांचा गल्ला या सिनेमाने जमवला आहे अशी माहिती दिली. ते पाहून माझ्या ओळखीच्या ज्या लोकांनी हा सिनेमा पाहिला नव्हता त्यांना मी थिएटर मध्ये जाऊन हा सिनेमा बघायचा आग्रह केला. सिनेमाला गर्दी असणार म्हणून ऑनलाईन तिकीट आधी बुक करा असेही सांगितले.

आज माझे दोन मित्र अडव्हान्स बुकिंग न करताच अंधेरीतील मल्टिप्लेक्स मध्ये हा सिनेमा पहायला गेले. तर संपूर्ण थिएटर मध्ये ते दोन मित्रच. बाकी प्रेक्षकच नाही. त्यांनी तिथूनच मला फोन करून सांगितलं ” तुम्ही तर सांगत होता गर्दी असणार आधी तिकीट बुक करा, पण इथे तर प्रेक्षकच नाही, बरं झालं ऑनलाईन तिकीट नाही बुक केलं नाहीतर जास्त पैसे गेले असते”. त्यांचं बोलणं ऐकून मला वाटलं कदाचित ते माझी थट्टा करत असतील. मी त्यांना तसे बोलूनही दाखवले.रोज सोशल मीडियावर ज्या सिनेमाच्या विक्रमी कलेक्शनबद्दल बातम्या येतायेत, ते खोटं कसं असेल? बरं ऑनलाईन बुक माय शो वर तर या सिनेमाला 80% पेक्षा जास्त रिस्पॉन्स असल्याचं दाखवतायेत. मग हे सगळं खोटं कसं असू शकेल?.

मित्राने लगेच थिएटर मध्ये प्रेक्षक किती आहे ते दाखवण्यासाठी मोबाईलवर व्हिडिओ शूट करून मला पाठवला. तो व्हिडिओ पाहून माझी खात्री पटली. सिनेमाच्या इंटरव्हलमध्ये परत फोन करून त्याने मला सांगितलं की आधी ते दोघेच होते नंतर आणखी चारजण आले. चारमधील, एक वयोवृद्ध जोडपे होते आणि दुसरे जोडपे जे आले होते ते सिनेमापेक्षा थिएटर मधील अंधाराचा व्यक्तिगत आनंद घेण्यासाठी आल्याचे दिसत होते.

करोडो रुपये खर्च करून बनविण्यात आलेला आणि त्यावर करोडो रुपये पब्लिसिटी खर्च केलेल्या सिनेमाला बोटावर मोजण्याइतके प्रेक्षक यावे हे त्या चित्रपटाच्या संपूर्ण टीम विशेषतः कलाकारांच्या साठी किती दुःख दायक असेल. त्या सिनेमाला प्रेक्षक नाही हे त्या सिनेमाचं दुर्दैव की प्रेक्षक जबाबदार????,” असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

महेश टिळेकर यांनी शेअर केलेली ही पोस्ट सध्या चांगली व्हायरल होत आहे. यावर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. यातील अनेकांनी हा चित्रपट चंद्रमुखी असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रमुखी असणार हा..निव्वळ फसवेगिरी सुरू आहे. एवढे कोटी तेवढे कोटी. वास्तवात मात्र थिएटर रिकामे…, अशी कमेंट एका व्यक्तीने केली आहे. तर एकाने सगळ्याच चित्रपटांची अवस्था अशी नाही. चांगल्या चित्रपटाला लोक गर्दी करतातच. तमाशाप्रधान चित्रपट पूर्वी चालायचे, पण आता काळ बदललाय, अशी कमेंट केली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Producer director mahesh tilekar share empty theater video and comment on marathi film audience nrp
First published on: 07-05-2022 at 14:54 IST