बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट येत्या ११ ऑगस्ट २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री करीना कपूर खान स्क्रीन शेअर करणार आहे. सध्या या चित्रपटाचे प्रमोशन जोरदार पद्धतीने केले जात आहे. या चित्रपटाचा ट्रेलर अद्याप प्रदर्शित झालेला नाही. मात्र चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याला विरोध सुरु झाला आहे. उत्तरप्रदेशातील सुलतानपूरमध्ये काही अज्ञातांनी आमिर खान आणि त्याच्या चित्रपटाविरोधात जोरदार निदर्शने केली. तसेच या चित्रपटाचे पोस्टर्सही फाडून टाकण्यात आले आहेत.

दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, सुलतानपूरच्या विजेथुआ खाममध्ये हिंदुत्ववादी संघटनेने या चित्रपटाविरोधात निषेध नोंदवला आहे. येत्या २९ मे रोजी आयपीएलच्या अंतिम सामन्यादरम्यानही आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला जाणार आहे. या ट्रेलरच्या दिवशीही या संघटनेकडून आंदोलन केले जाणार आहे.

“आमिर खान हा आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठी उपस्थित राहणार आहे. आमिर हा अनेकदा भारतीय संस्कृती आणि सभ्यतेच्या विरोधात बोलतो. तसेच आमिर हा हिजाबचा सर्वात मोठा समर्थक आहे. त्याची मुलगी ही फेसबुक आणि इतर सोशल मीडियावर कसे फोटो पोस्ट करते हे सर्वांना माहिती आहे”, असे सनातन रक्षक सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल सिंह म्हणाले.

“इतकंच नव्हे तर त्याच्या पत्नीलाही भारतात राहण्याची भीती वाटते. त्यामुळे अशा लोकांना आयपीएलचे मॅनेजमेंट कसे आमंत्रित करु शकते, याचा सर्व सनातनींना त्रास होत आहे. आमिरला पूर्णपणे वगळण्यात आले पाहिजे. जर तसे झाले नाही तर आम्ही दिल्लीपर्यंत जाऊ. त्याविरोधात आंदोलन करु”, असाही इशारा त्यांनी दिला.

महेश मांजरेकरांच्या महत्त्वकांक्षी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचा पहिला लूक समोर, ‘हा’ अभिनेता साकारणार सावरकरांची भूमिका

१९९४ साली प्रदर्शित झालेल्या ‘फॉरेस्ट गम्प’ या ऑस्कर पुरस्कार विजेत्या चित्रपटावरुन ‘लालसिंग चड्ढा’ या चित्रपटाचे कथानक तयार करण्यात आले आहे. या चित्रपटात आमिर एक पंजाबी व्यक्तिरेखा साकारत आहे. येत्या ऑगस्ट महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.