गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या याच जयघोषात आपल्या लाडक्या बाप्पाला ठिकठिकाणी निरोप दिला जात आहे. गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला अशा भक्तीपूर्ण वातावरणात आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला जात आहे. गणपती बाप्पाला निरोप देताना सर्वच गणेशभक्तांचे डोळे पाणावले आहेत. यात सर्वसामान्यांपासून कलाकारांचाही समावेश आहे. मराठीतील अनेक कलाकार आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी याबाबत पोस्ट शेअर करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रसिद्ध मराठी अभिनेता आणि ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला कोल्हापूरचा रांगडा गडी म्हणजेच हार्दिक जोशी याने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने त्याच्या घरातल्या आणि सार्वजनिक बाप्पाच्या दर्शन घेतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. याला त्याने फारच हटके कॅप्शन दिले आहे. “गणपती चालले गावाला…चैन पडेना आम्हाला. बोला गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या !!” असे हार्दिक जोशीने या फोटोला कॅप्शन देताना म्हटले आहे.

आणखी वाचा : Ganapati Visarjan 2022 Live : आज निरोपाचा दिवस, महाराष्ट्रात गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांचा उत्साह!

तसेच मराठी अभिनेत्री जुई गडकरी हिने देखील बाप्पाच्या विसर्जनाच्या दिवशी एक खास पोस्ट शेअर केली आहे. यात तिने गणपती बाप्पाला आर्त साद घातली आहे. तिने तिच्या घरातील बाप्पाचे काही फोटो शेअर केले आहेत. यात ती सुंदर पारंपारिक वेषात पाहायला मिळत आहे.

“बाप्पा, तु जे काही दिलेस त्यासाठी खुप धन्यवाद…. माझ्या जिवाभावाच्या माणसांना उदंड आयुष्य दे.. तुझे लक्ष त्यांच्यावर आयुष्यभर असेच राहू दे.. त्या सर्वांना सुखात, आनंदात आणि समाधानात ठेव.. हीच तुझ्या चरणी प्रार्थना” गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!! अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!” असे कॅप्शन जुई गडकरीने या फोटोला दिले आहे. तिची ही पोस्ट सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

तसेच बिग बॉसमधून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता पुष्कर जोग याने या निमित्ताने त्याच्या लेकीचा एक गोड व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्याच्या लेकीला फेटा बांधल्याचे दिसत आहे. त्यानंतर त्याची लेक फार उत्साहात नाचताना पाहायला मिळत आहे.

या फोटोला कॅप्शन देताना पुष्कर जोग म्हणाला, “गणपती बाप्पा मोरया…. पुढच्या वर्षी लवकर या. खरंतर जाऊच नका, बाप्पा आम्हाला तुमची खरंच गरज आहे”, असे कॅप्शन पुष्कर जोगने दिले आहे.

दरम्यान जवळपास दोन वर्षांनंतर यंदा निर्बंधमुक्त वातावरणात महाराष्ट्रासह देशभरात आणि विदेशातही धुमधडाक्यात बाप्पाचं आगमन झाल्याचे पाहायला मिळाले. गेल्या दहा दिवसांपासून सर्वच ठिकाणी गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत होता. विशेष म्हणजे आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाला तितक्याच उत्साहात निरोप दिला जात आहे. मुंबई-पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांचा उत्साह पाहायला मिळत आहे. सर्वत्र साश्रु नयनांनी गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप दिल्याचे पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pudhchya varshi lavkar ya hardeek joshi jui gadkari and other marathi actors get emotional over ganpati visarjan nrp
First published on: 09-09-2022 at 17:54 IST