सध्या सोशल मीडियावर दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा’ चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केलेल्या या चित्रपटातील सर्वच गाणी सुपरहिट ठरली आहेत. या चित्रपटातील श्रीवल्ली या गाण्याच्या स्टाईलने अनेकांना भुरळ पाडली आहे. आतापर्यंत हिंदी, तेलुगू, मल्याळम यासारखे अनेक भाषेत हे गाणे रिलीज झाले आहे. त्यासोबत एका युट्यूबरने या गाण्याचे मराठी व्हर्जन तयार केले आहे. सध्या हे गाणे तुफान हिट ठरले आहे. श्रीवल्ली या मराठी गाण्याचे फेम विजय खंडारे याने नुकतंच हे गाण्याच्या निर्मिती करण्यामागची कहाणी सांगितली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रीवल्ली या मराठी गाण्याचे व्हर्जन अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील निंभोरा बैलवाडी येथे राहणाऱ्या विजय खंडारे या तरुणाने केले आहे. त्याचे हे गाणे सध्या चांगलेच व्हायरल झाले आहे. याबाबत बोलताना तो म्हणाला, जनतेने दिलेल्या प्रेमामुळे आम्हला प्रोत्साहन मिळाले आहे. जनतेच्या मनोरंजनासाठी आम्ही अशाचप्रकारे नवनवीन कंटेंट आणत राहू. महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या प्रेमामुळेच हे शक्य झाले आहे.

‘श्रीवल्ली’ गाण्याच्या मराठी व्हर्जन निर्मितीमागची कहाणी

यावेळी विजयला हे गाणे कशाप्रकारे निर्मित केले? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी तो म्हणाला, ‘जेव्हा तेलुगू गाणे रिलीज झाले तेव्हा सहजच मी ते ऐकलं. हे गाणे ऐकायला फारच मनमोहक आहे. म्हणून मी सहजच दोन तीन वेळा ऐकले. त्याच्या दोन तीन दिवसानंतर ते गाणे पुन्हा इतर भाषेत रिलीज झाले. पण ते पाहिल्यानंतर असे वाटले की या भाषेत झाले, पण मराठीत रिलीज झालेले नाही. त्यामुळे मला सहजच वाटले की याचे मराठीत गाणे केले तर….आणि त्यानंतर मी ते लिहायला बसलो.’

“गाण्याचा साऊंडट्रक आणि चाल तीच ठेवली पण शब्द माझे…मी ते गाणे व्यवस्थित लिहिले आणि ते रचल्यानंतर घरातील व्यक्तींना ऐकवले. त्यानंतर माझ्या आई वडिलांनी चांगले गाणे आहे, असे मला सांगितले आणि त्यानंतर मी रेकॉर्डिंगसाठी गेलो. दीड महिना आधी गाणे रेकॉर्ड केले. प्रोफेशनल करण्यासाठी तेवढे पैसे नव्हते. आम्ही एक कॅमेरामॅन ठरवला पण तो आलाच नाही. त्यावेळी पर्याय नसल्याने आम्ही तो संपूर्ण व्हिडीओ मोबाईलवर रेकॉर्ड केला. त्यासाठी आम्हाला तीन दिवस लागले. जसे सीन हवे होते, त्यानुसार आम्ही ते केले. पण जितकं प्रोफेशनल हवं होतं तितकं ते झालं नाही. तरीही महाराष्ट्रातील जनतेला ते आवडलं. त्यानंतर त्यांनी मला भावी आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या,” असेही तो म्हणाला.

“मला फार आनंद झाला. त्यांचे प्रेम प्रतिसाद पाहून मला फारच भरुन आलं. महाराष्ट्रातील जनतेचे यासाठी खूप खूप आभार. यापुढेही आम्ही तुमच्यासाठी काहीतरी घेऊन येण्याचा प्रयत्न करु,” असेही त्याने सांगितले.

“…आणखी काय पाहिजे!”, किरण माने साकारणार ‘या’ ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

अल्लू अर्जून आणि रश्मिका मंदान्ना मुख्य भुमिकेत असणाऱ्या ‘पुष्पा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलाय आणि त्यामुळेच या चित्रपटाची भुरळ सर्वत्र दिसत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत ३०० कोटी रूपयांची कमाई केलीय. या चित्रपटाच्या पहिल्या पार्टनंतर आता दुसऱ्या पार्टसाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pushpa movie srivalli song marathi version amravati vijay khandare reveals the story behind the production nrp
First published on: 20-01-2022 at 17:01 IST