मराठी चित्रपटसृष्टीत सध्या वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट तयार होत असून या चित्रपटांना प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. मराठी चित्रपट उत्पन्नाच्या बाबतीतही नवनवे विक्रम करत असून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांतही मराठी चित्रपटांनी बाजी मारली आहे. मराठी तरुण पिढी वेगळ्या विषयांवरील हे चित्रपट आवर्जून पाहते आहे. उत्पन्नाचे नवे विक्रम करून तरुणाईला पुन्हा एकदा मराठी चित्रपटांकडे खेचून घेणाऱ्या अलिकडच्या चित्रपटांमध्ये ‘दुनियादारी’ या चित्रपटाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. एखादा चित्रपट हिट झाला की त्या चित्रपटाच्या चमूकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढतात. प्रेक्षक त्या चमूच्या नव्या चित्रपटाकडे डोळे लावून बसलेले असतात. ‘दुनियादारी’मधील स्वप्नील जोशी आणि सई ताम्हनकर ही जोडी आणि ‘दुनियादारी’चे दिग्दर्शक संजय जाधव यांच्या ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’ या नव्या चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘दुनियादारी’च्या प्रचंड यशानंतर संजय जाधव यांचेच दिग्दर्शन असलेला आणि प्रदर्शित होणारा हा पहिलाच चित्रपट असणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक संजय जाधव यांच्याशी बोलायला सुरुवात झाली ती साहजिकच ‘दुनियादारी’च्या यशाचे दडपण जाणवते का? या प्रश्नानेच. जाधव म्हणाले, खरे आहे. ‘दुनियादारी’ प्रचंड गाजला. त्यामुळे आता ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’ करताना नाही म्हटले तरी आमच्या सगळ्यांवर थोडे दडपण आहे. सगळ्यांच्याच अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत. नव्या चित्रपटावर आम्ही सगळ्यांनी आमच्या परिने काम करायला सुरुवात केली आहे. ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’मधून कोणताही संदेश आम्हाला द्यायचा नाहीये तर प्रेक्षकांना जे आवडते ते द्यायचा आम्ही प्रयत्न करतोय. पाहू या पुढे काय होते.‘दुनियादारी’ चित्रपटातून प्रेम, मैत्री, संघर्ष, भावनिक नात्यांची गुंतागुंत आणि आजच्या तरुण पिढीला आवडेल असा मसाला ठासून भरलेला होता. ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’त्याच अंगाने जाणारी आहे का? यावर जाधव यांनी या चित्रपटाच्या निमित्ताने मराठीत एक वेगळा विषय आम्ही आणतोय. हिंदूू तरुण आणि मुस्लिम तरुणी यांची प्रेमकथा आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या सर्व गोष्टी यात पाहायला मिळतील. ही गोष्ट मुंबईतच घडणारी आहे. चित्रपटात सई ताम्हनकर ‘अॅक्शन’ लूकमध्ये दिसणार असल्याच्या चर्चेविषयी विचारणा केली असता, तसे काही नाहीये. चित्रपटातील भूमिकेसाठी सई ही बारीक दिसायला हवी होती. ती तशी दिसण्यासाठी तिला काही टिप्स दिल्या होत्या. त्या तिने केल्या असे सांगत एकूणच चित्रपट, यातील सईची भूमिका, तिचा लूक या विषयीचा ‘सस्पेन्स’ कायम ठेवला.सिनेमॅटोग्राफर अर्थात कॅमेरामन म्हणून काम करणारे जाधव हे ठरवून ‘दिग्दर्शक’ झाले का, असे विचारले असता ते म्हणाले, हे काही ठरवून झालेले नाही. मी कोणतीच गोष्ट कधी ठरवून करत नाही. सिनेमॅटोग्राफर म्हणून अनेक वर्षे काम केल्यानंतर काहीतरी वेगळे करून पाहावे असा विचार मनात आला आणि दिग्दर्शनाकडे वळलो. दिग्दर्शक म्हणून माझा ‘चेकमेट’ हा पहिला चित्रपट. त्यानंतर ‘रिंगा रिंगा’, ‘फक्त लढ म्हण’ असे चित्रपट केले आणि ‘दुनियादारी’ने दिग्दर्शक म्हणून माझी एक वेगळी ओळख निर्माण केली. असेच माझ्या सध्याच्या ‘परीक्षक’या भूमिकेबद्दल म्हणता येईल. ‘फू बाई फू-नया है वह’च्या नवीन पर्वासाठी मला परिक्षक म्हणून काम करण्याविषयी विचारणा झाली आणि पुन्हा एकदा काहीतरी वेगळे करण्याची संधी मिळतेय म्हणून मी ती भूमिका स्वीकारली. पण या नव्या भूमिकेतही मी खूप आनंद घेतो आहे. ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’ चित्रपटात उर्मिला कानेटकर, नागेश भोसले, उपेंद्र लिमये, समीर धर्माधिकारी, चिन्मय मांडलेकर हे कलाकारही आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 11th May 2014 रोजी प्रकाशित
प्यारवाली लव्ह स्टोरी!
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट तयार होत असून या चित्रपटांना प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे

First published on: 11-05-2014 at 12:05 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pyaar wali love story