अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या करुन जवळपास दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र अद्यापही त्याच्या आत्महत्येचं कारण स्पष्ट झालेलं नाही. सुशांतने बॉलिवूडमधील घराणेशाहीला कंटाळून आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. याप्रकरणी करण जोहर, महेश भट्ट यांच्यावर अनेकांनी घराणेशाहीचा आरोपही केला आहे. त्यातच दिवंगत अभिनेत्री जिया खान हिच्या आईने ‘इंडिया टुडे’शी बोलत असताना महेश भट्ट यांच्यावर अनेक आरोप केले आहे. तसंच महेश भट्टने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा खळबळजनक दावाही त्यांनी केला आहे.
२०१३ मध्ये अभिनेत्री जिया खान हिने राहत्या घरात आत्महत्या केली. तिच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले होते. जियाच्या आईने राबिया खान यांनी कलाविश्वातील काही व्यक्तींवर जियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर सुशांतप्रकरणी भाष्य करत असताना त्यांनी जियाच्या अंत्यसंस्कारावेळी घडलेला एक प्रसंग सांगितला आहे. अंत्यसंस्कार सुरु असताना महेश भट्ट यांनी धमकी दिल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
“सात वर्षांपूर्वी जियाच्या अंत्य संस्काराच्या दिवशी महेश भट्ट घरी आले होते. त्यावेळी तुमची मुलगी नैराश्यात होती असं महेश भट्ट यांनी सांगितलं. परंतु, मी या गोष्टीचा विरोध केला. माझी मुलगी नैराश्यात नव्हती असं मी ठामपणे सांगितलं. त्यावर माझा विरोध पाहून तुला सुद्धा इंजक्शन देऊ शांत झोपवेन”, अशी धमकी त्यांनी मला दिली होती.
पुढे त्या म्हणतात,”सुशांतच्या बाबतीतही तेच होताना दिसतंय. तो नैराश्यात होता असं म्हटलं जात आहे. माझी मुलगी नैराश्यात नव्हती, तिचा तर खून झाला होता. पण सुशांत मात्र बिचारा अडकला गेला. मी खोट बोलत नाही. खरं सांगते. मी विनाकारण कोणावर आरोप करत नाही. मी सांगत असलेल्या सत्याला तुम्ही कशाही पद्धतीने पाहा, तुम्ही माझ्याविरुद्ध न्यायालयापर्यंत जा. पण इतके वर्ष मी शांत राहिले, पण आता नाही मी स्वत: ची लढाई लढत होते. पण सुशांत सिंह आणि दिशा सलियनचं प्रकरण पाहून मला मौन बाळगून राहणं अशक्य झालं होतं म्हणून मी सगळ्या गोष्टी जाहीररित्या सांगितल्या. जियाच्या प्रकरणात ज्या गोष्टी घडल्या होत्या, त्याच सगळ्या सुशांत्या बाबतीत घडताना दिसत आहेत”.
दरम्यान, २०१३ मध्ये अभिनेत्री जिया खानने आत्महत्या केली होती. यावेळी जियाने नैराश्यात येऊन आत्महत्या केली नसून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचं तिच्या आईने म्हटलं होतं. तसंच अभिनेता सूरज पांचोलीवरदेखील अनेक आरोप केले होते.