आपलं हक्काचं घर असावं, आलिशान बंगला असावा असं अनेकांना वाटतं. सिनेविश्वात अनेक कलाकार भाड्याने राहतात, पण नंतर त्यांच्या मनासारखं अपार्टमेंट किंवा बंगला विकत घेतात. एका सेलिब्रिटी जोडप्याचाही आलिशान बंगला आहे, मात्र आता त्यांनी बंगल्यातून बाहेर पडायचं ठरवलं आहे. दाक्षिणात्य अभिनेते व राजकारणी सरथकुमार यांनी त्यांचा आलिशान बंगला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. बंगला सोडण्यामागचं कारण काय, त्याचा खुलासाही त्यांनी स्वतःच केला आहे.
सरथकुमार व त्यांची पत्नी राधिका सरथकुमार यांचा चेन्नईतील ईसीआर येथे आलिशान बंगला आहे. पण आता हे जोडपं त्या बंगल्यात राहणार नाही. बंगल्याची देखभाल करताना येणाऱ्या आव्हानांमुळे त्यांनी हा बंगला सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
बंगल्याची देखभाल करणं कठीण
सरथकुमार एका मुलाखतीत म्हणाले की, त्यांचा बंगला १५,००० चौरस फूट जागेवर आहे. त्याची देखभाल करणं या जोडप्याला दिवसेंदिवस कठीण होत आहे. बंगल्याला सात दरवाजे आहेत, त्यामुळे दररोज ते सर्व दरवाजे बंद करणं, घर सुरक्षित आहे की नाही त्याची खात्री करणं कठीण होत होतं.
इतक्या मोठ्या घराची देखभाल करण्यासाठी किमान १५ नोकरांची गरज भासते, पण तेवढे नोकर ठेवणं शक्य नाही. सरथकुमार व राधिका दोघेही स्वतः बंगल्याची देखभाल करू शकत नसल्यामुळे त्यांनी चेन्नईतील अलवरपेट येथे एका लहान घरात शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला.
सरथकुमार यांनी बिहाइंडवुड्सला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत त्यांच्या ३० वर्षांपूर्वी बांधलेल्या बंगल्याबद्दल माहिती दिली होती. त्यांनी स्वतः हा बंगला डिझाईन केला होता. सरथकुमार यांचा बंगला अष्टकोनी आकारात आहे. या बंगल्यात एक कॉन्फरन्स रूम आणि मीटिंग्ज घेण्यासाठीही वेगळी जागा होती. घराचे मुख्य आकर्षण म्हणजे त्यांच्या मुलाने डिझाइन केलेली कोलाज भिंत होती. या भिंतीवर एमजीआर आणि शिवाजी गणेशन सारखे दिग्गज तमिळ चित्रपटसृष्टीतील कलाकार, तसेच रॉजर मूर, जॅकी चॅन आणि एरोल फ्लिन सारख्या आंतरराष्ट्रीय स्टार्सचे फोटो आहेत.
सरथकुमार यांच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ते शेवटचे 3BHK चित्रपटात दिसले होते. या चित्रपटात देवयानी, सिद्धार्थ आणि मीठा रघुकुमार कलाकारांनीही काम केलं होतं.
दरम्यान, सरथकुमार यांनी २४ वर्षांपूर्वी २००१ मध्ये राधिकाशी लग्न केलं होतं. त्यांना त्यांच्या पहिल्या लग्नापासून दोन मुली आणि राधिकापासून एक मुलगा आहे.