रेडिओ सिलोनच्या िहदी विभागाने ‘भैरवी’ घ्यायची तयारी सुरू केल्याने केवळ आपल्या देशातलेच नाहीत तर दक्षिण आशियातील लाखो ज्येष्ठ नागरिक सध्या कमालीचे अस्वस्थ आहेत. एकेकाळी जगातील सर्वाधिक लोकप्रिय रेडिओ वाहिनी असणाऱ्या रेडिओ सिलोनवर ही वेळ का आली, या वाहिनीचं महत्त्व/वेगळेपण ते काय, त्याचा धांडोळा..
समस्त कानसेनांच्या सांस्कृतिक विश्वात गेल्या सोमवारी प्रचंड खळबळ उडाली. कारणही तसंच होतं, अनेकांचे म्हणजे लाखो रसिकांचे हात सवयीनुसार शॉर्ट वेव्हवरच्या २५ मीटर बँडवर फिरले. सकाळी आठ वाजेपर्यंत सारं काही आलबेल होतं, त्यानंतर मात्र रेडिओ सिलोनच्या या िहदी विभागाचं काय बिनसलं कुणास ठाऊक. कुंदनलाल सगलचं गाणं संपल्यानंतर ‘आपकी फर्माईश’ हा नेहमीचा कार्यक्रम ऐकण्यासाठी सरसावलेल्या कानसेनांची घोर निराशा झाली, काहीतरी गडबड झाली असेल, या आशेने या मंडळींनी रात्रीच्या सत्रासाठी संध्याकाळी सात वाजता पुन्हा रेडिओचा कान पिरगाळला, मात्र तेव्हाही सकाळचीच पुनरावृत्ती झाली. त्यानंतर रोज हाच प्रकार होऊ लागला आणि या कानसेनांच्या काळजात कालवाकालव झाली. ही परिस्थिती एका रात्रीत निर्माण झालेली नाही. या िहदी विभागातून काहीच महसूल मिळत नसल्याने श्रीलंका ब्राँडकास्टिंग कॉर्पोरेशनने २००८ पासूनच या वाहिनीचा गाशा गुंडाळण्याची तयारी सुरू केली आहे. अगदी गेल्या वर्षी जुलमध्येही हाच प्रकार घडला होता, तेव्हा ते गंडांतर टळलं होतं, मात्र आता रेडिओ सिलोनची घरघर स्पष्टपणे ऐकू येऊ लागली आहे. एखादं रेडिओ चॅनल तेही परदेशातलं, बंद झालं तर काय फरक पडतो, असा प्रश्न उपस्थित होणं साहजिक आहे. त्यात तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झालेल्या अचाट क्रांतीमुळे इंटरनेटवर एका क्लिकमध्ये कोणत्याही देशातलं, कोणत्याही भाषेतलं, कोणतंही गाणं क्षणात मिळू शकतं. मात्र, हा प्रश्न एवढय़ापुरता सीमित नाही. लाखो-कोटय़वधी कानसेनांवर रेडिओ सिलोनचे सहा दशकांपासून अनंत उपकार आहेत. आपली आकाशवाणी होतीच, मात्र आकाशवाणीवरून केवळ शास्त्रीय संगीत प्रसारित करायचं, सिनेसंगीताला थारा द्यायचा नाही, असा तुघलकी फतवा केंद्र सरकारने काढल्याने रेडिओ सिलोनचा मार्ग मोकळा झाला. त्यात भर पडली ती ‘बिनाका गीतमाले’ची. १९५२पासून सुरू झालेली ही गीतमाला म्हणजे रेडिओ सिलोनची श्रीमंती ठरली.
कालांतराने आकाशवाणीची विविधभारती सुरू झाली, मात्र रेडिओ सिलोनची लोकप्रियता विविधभारतीला लाभली नाही. एचएमव्हीसारख्या तगडय़ा कंपन्याही सिलोनला झुकतं माप देत असत. एचएमव्हीने वेळोवेळी आपल्या मास्टर रेकॉर्ड्स सिलोनला दिल्या आहेत. एचएमव्हीसह अन्य कंपन्यांच्या सुमारे लाखभर रेकॉर्ड्सने सजलेली लायब्ररी ही रेडिओ सिलोनची खरी संपत्ती आहे. अनेक दुर्मिळ मराठी, हिंदी चित्रपटगीते या संग्रहात आहेत. हिंदी चित्रपटसंगीताच्या सुवर्णकाळातली जी गाणी तेथे ऐकवली जातात, त्यातली अनेक गाणी अन्य कोठेही उपलब्ध नाहीत. जगभरात कोठेही शॉर्ट वेव्ह लागू शकणं आणि सुस्पष्ट प्रसारण हीसुद्धा या वाहिनीची वैशिष्टय़े आहेत. निधीअभावी उद्या हा हिंदी विभाग बंद होऊन या लाखो अमूल्य रेकॉर्ड्स धूळ खात पडल्या तर जुन्या काळातील गुणी कलाकारांप्रती तो कृतघ्नपणाच ठरेल. जे अप्राप्य असतं त्याला उद्देशून ‘लंकेत सोन्याच्या विटा’ अशी एक म्हण आपल्याकडे रूढ आहे. रेडिओ सिलोनवरील हा खजिना आपल्या सांगीतिक समृद्धीचं संचित असून तो जपणं अत्यावश्यक आहे. दुभती गाय भाकड झाली म्हणून तिला कसायाकरवी डोळ्यांदेखत कोणी कापत नसतं.
श्रोते म्हणतात..
कवी सुधीर मोघे व मी २००८मध्ये श्रीलंकेत जाऊन श्रीलंका ब्राँडकािस्टग कॉर्पोरेशनचे अध्यक्ष हडसन समरसिंगे यांना भेटलो व रेडिओ सिलोन पूर्वीप्रमाणे चालू ठेवण्याची विनंती केली. त्यावर ‘तुम्ही आम्हाला दरमहा पाच लाख रुपयांच्या जाहिराती द्या, आम्ही हे चॅनेल सुरू ठेवतो’, असं समरसिंगे म्हणाले. भारतात परतल्यानंतर आम्ही असे प्रायोजक मिळविण्यासाठी खूप धडपड केली, मात्र काहीच प्रतिसाद मिळाला नाही, अशी माहिती कुमार नवाथे यांनी दिली. तर, सिलोनची तामिळ, मल्याळम, सिंहली, इंग्रजी भाषेतली चॅनल्स व्यवस्थित सुरू असल्याने केवळ िहदी विभागाला महसुलाचे कारण का सांगितले जात आहे, सदाबहार िहदी गाण्यांवर त्यांची वक्रदृष्टी का आहे, एकेकाळी या विभागाने सिलोनला भरभरून दिलं आहे, त्यामुळे ही सेवा आक्रसण्यामागे भाषक आकस तर कारणीभूत नाही ना, अशी शंका प्रवीण चव्हाण यांनी उपस्थित केली.
टाटातील ज्येष्ठ अधिकारी व संगीतप्रेमी योगेश जोशी यांनी सांगितले, समरसिंगे यांच्याशी गेल्याच आठवडय़ात झालेल्या चर्चेदरम्यान आम्ही त्यांना जाहिरातीच्या माध्यमातून दरमहा १० लाख रुपये मिळवून देण्याची हमी दिली. मात्र, त्यांची मागणी अवास्तव आहे. त्यांच्याकडील रेकॉर्ड्स हा आपला राष्ट्रीय ठेवा असल्याने यातून मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकारने श्रीलंकेवर दबाव आणला तर क्षणार्धात ही समस्या सुटू शकते.
एका लग्नाची गोष्ट..
‘रेडिओ सिलोन’च्या हिंदी कार्यक्रमांचा प्रमुख या नात्याने मी १९५६ ते ६७ या कालावधीत काम केलं. काम करण्याचं स्वातंत्र्य व श्रोत्यांचं अमर्याद प्रेम यामुळे आम्ही सारे भारावलेले होतो. आपल्या मुलाचं लग्न व्हावं, असं माझ्या आई-वडिलांना वाटत होतं. त्यामुळे १९६४मध्ये मी आमचे महासंचालक क्लिफर्ड डॉट यांच्याकडे दोन महिन्यांची रजा मागण्यासाठी गेलो. त्यावर त्यांनी मला विचारलं, ‘तरुणा, तुला पुन्हा लग्न करायचं आहे का?’ झपाटल्याप्रमाणे काम करणाऱ्या माझ्यासारख्या तरुणाचं रेडिओ सिलोनशी जणू लग्न झालं होतं, असं सुचवून त्यांनी माझ्या कामाला दिलेली दाद मी आजवर विसरलो नाही, अशी आठवण ज्येष्ठ निवेदक गोपाल शर्मा यांनी सांगितली.
संग्रहित लेख, दिनांक 27th Jul 2014 रोजी प्रकाशित
सिलोनमध्ये सोन्याच्या विटा!
रेडिओ सिलोनच्या िहदी विभागाने ‘भैरवी’ घ्यायची तयारी सुरू केल्याने केवळ आपल्या देशातलेच नाहीत तर दक्षिण आशियातील लाखो ज्येष्ठ नागरिक सध्या कमालीचे अस्वस्थ आहेत.

First published on: 27-07-2014 at 03:39 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Radio ceylon to shut broadcasting