अभिनेता शाहरुख खान त्याच्या चित्रपटांसोबतच त्याच्या प्रभावी अभिनयासाठीही ओळखला जातो. जवळपास २५ वर्षांपेक्षा जास्त काळ चित्रपटसृष्टीत योगदान देणाऱ्या या किंग खानच्या चाहत्यांच्या आकड्यातही दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने शाहरुख खान बॉलिवूडचा ‘रईस’ ठरत आहे. किंग खान लवकरच ‘रईस’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विविध कारणांनी चर्चेत असणाऱ्या ‘रईस’ हा चित्रपट सध्या एका नव्या कारणामुळे गाजत आहे.

मुंबई उपनगरातील एका चर्मकारावर किंग खानच्या ‘रईस’ या चित्रपटाचा चांगलाच प्रभाव पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये असणारा शाहरुख खानचा एक डायलॉग या चर्मकारासाठी प्रेरणादाई ठरला आहे. निदान त्याच्या दुकानाकडे पाहिले तर तसेच जाणवते. ‘कोई धंदा छोटा नही होता…और धंदे से बडा कोई धर्म नही होता’, या डालॉगचे एक बॅनर मुंबई उपनगरातील या चर्मकाराने त्याच्या दुकानात लावले आहे.

srk-fan-3

‘रईस’ चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीलाच शाहरुखच्या आवाजातील हा डायलॉग आणि पडद्यावर दिसणारी दृश्ये सर्वांचेच लक्ष वेधतात. हाच लक्षवेधी डायलॉग आवडल्यामुळे शाम बहादुर रोहिडा यांनी त्यांच्या दुकानात हा डायलॉग लावला आहे. त्यामुळे प्रेक्षक चित्रपटांकडे फक्त मनोरंजनाचे साधन म्हणूनच न पाहता त्यातून रोजच्या जीवनासाठी प्रेरित सुद्धा होतात हे स्पष्ट झाले आहे. मुळच्या उत्तर प्रदेशातील शाम बहादुर यांनी ‘रईस’मधील या डायलॉगचे मोठे बॅनर प्रिंट करुन रस्त्याच्या कडेला असलेल्या त्यांच्या दुकानात लावले आहे. ‘रईस’चे हे जबरा फॅन कनेक्शन सध्या अनेकांचेच लक्ष वेधत आहे. सोशल मीडियावरही शाम बहादुर यांच्या दुकानाच्या चर्चा रंगत आहेत.

srk-fan

दरम्यान, ‘रईस’ या चित्रपटातून शाहरुख खान एका वेगळ्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. ‘रईस’ हा चित्रपट गुजरातच्या दरियापूरमधील अवैध दारुचा व्यवसाय करणाऱ्या अब्दुल लतीफच्या जीवनावर आधारित आहे. अब्दुल लतीफ हा दाऊदच्या जवळचा व्यक्ती होता. छोटे, मोठे अवैध धंदे करणारा अब्दुल अंडरवर्ल्डचा डॉन कसा झाला, या भोवती सिनेमाचे कथानक फिरताना दिसणार आहे. शाहरुख खान, नवाझुद्दिन सिद्दिकी, माहिरा खान, मोहम्मद झिशान आयुब यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.