‘पद्मावत’ चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यावरील गुन्हा रद्द करण्याचे आदेश राजस्थान हायकोर्टाने दिले आहेत. डिडवाना पोलीस स्टेशनमध्ये भन्साळी, रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा रद्द करण्याची मागणी भन्साळींनी याचिकेद्वारे केली होती.

इतिहासाची मोडतोड करून या चित्रपटाची निर्मिती केली असून राणी पद्मावतीची प्रतिमा मलिन करण्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. भन्साळींच्या याचिकेवर निकाल देण्यापूर्वी जोधपूरच्या चार न्यायाधीशांसाठी पद्मावतच्या स्पेशल स्क्रिनिंगचेही आयोजन करण्यात आले होते. कडेकोट पोलीस बंदोबस्तात ही स्क्रिनिंग पार पडली. त्यानंतर हायकोर्टाने हे आदेश दिले.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही करणी सेनेच्या तीव्र विरोधामुळे राजस्थानमध्ये पद्मावत हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. त्यामुळे सोमवारी न्यायाधीशांसाठी पार पडलेला हा राजस्थानमधील पहिला शो होता. त्यामुळे आता हायकोर्टाच्या निर्णयाने भन्साळींना दिलासा मिळाला आहे.

दुसरीकडे बॉक्स ऑफीसवर पद्मावत हा चित्रपट जोरदार कमाई करत आहे. करणी सेनेच्या तीव्र विरोधानंतर हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांकडून त्याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.