Rajinikanth Coolie Movie Collection : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत हे गेल्या पाच दशकांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. दाक्षिणात्य सिनेमांसह त्यांनी हिंदी सिनेमांतूनही आपल्या अभिनयाची जादू सर्वांना दाखवली आहे आणि त्यांची ही जादू अजूनही कायम आहे. त्यांच्या प्रत्येक सिनेमाची चाहते आतुरतेने वाट बघत असतात.

अशातच त्यांचा ‘कुली’ नावाचा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या सिनेमाला चाहते तूफान गर्दी करताना दिसत आहेत. यामुळे हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. या सिनेमाच्या कामाइत आठवड्याच्या शेवटी थोडी घट झाली असली, तरी एका आठवड्यानंतर या सिनेमाचं एकूण जागतिक कलेक्शन ₹४५० कोटींच्या अगदी जवळ आहे.

लोकेश कनागराज दिग्दर्शित ‘कुली’ने सुरुवातीपासूनच चांगली कमाई केली असल्याचं पाहायला मिळतं आहे. पहिल्या चार दिवसांत या चित्रपटाने जगभरात ३५० कोटींपेक्षा जास्त कमावले. मात्र सोमवारपासून कमाईत सुमारे ६५% घट झाली. गुरुवारपर्यंत या सिनेमाचं भारतातल कलेक्शन एक आकडी होतं; तरी सुरुवातीच्या चांगल्या कामगिरीमुळे सिनेमाने भारतात एकूण २३० कोटी रुपयांची कमाई झाली आहे.

परदेशातही ‘कुली’ने तामिळ चित्रपटांचे अनेक रेकॉर्ड मोडले असून, तिथे सुमारे २१ मिलियन म्हणजेच १७१ कोटींची कमाई झाली आहे. त्यामुळे एकूण जागतिक कलेक्शन सध्या ४४४ कोटी इतकं आहे. त्यामुळे हा चित्रपट लवकरच ४५० कोटींचा टप्पा पार करेल, अशी शक्यता आहे.

‘कुली’चं ४४४ कोटींचं कलेक्शन हे ज्युनिअर एनटीआरच्या अलीकडील ‘देवारा: भाग १’ या चित्रपटाच्या (₹४३० कोटी) पुढे गेलं आहे. आता या चित्रपटाचं लक्ष विजयच्या ‘द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम (GOAT)’ या चित्रपटावर आहे, ज्याचं एकूण जागतिक कलेक्शन ₹४५७ कोटी असल्याचं सांगितलं जात आहे.

सध्या ‘कुली’ तामिळ सिनेमांमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. या यादीत टॉप ५ मध्ये रजनीकांतचे ‘२.०’ आणि ‘जेलर’, विजयचे ‘लिओ’ आणि ‘GOAT’, तसेच मणिरत्नमचा ‘पोन्नियिन सेल्वन: भाग १’ या सिनेमांचा समावेश आहे. या तुलनेत, सध्या ‘कुली’ची कमाईची गती काहीशी कमी झाली आहे, त्यामुळे तो आणखी किती कमाई करेल? हे पाहावं लागेल.

कुली’ या चित्रपटात रजनीकांत हे एका निवृत्त कुलीच्या भूमिकेत आहे. तो आपल्या मित्राच्या रहस्यमय मृत्यूचा तपास करत असताना गुन्हेगारी दुनियेत अडकतो आणि पुढे काय घडतं, याचीच कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.

दरम्यान, या चित्रपटात नागार्जुन, श्रुती हासन, सौबिन शाहीर, उपेन्द्र आणि सत्यराज हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. विशेष म्हणजे बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने या चित्रपटातून छोट्या पण लक्षवेधी भूमिकेद्वारे तमिळ इंडस्ट्रीत पदार्पण केलं आहे.