६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचा वितरण सोहळ्यात दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांना चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ ने गौरवण्यात आले. रजनीकांत यांनी आजवर त्याच्या अभिनयाने लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. गेली ३० वर्ष रजनीकांत चाहत्यांचं भरभरून मनोरंजन करत आहेत. त्यामुळे चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी रजनीकांत ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ ने गौरवण्यात आले. यावेळी रजनीकांत यांची पत्नी लता, मुलगी सौंदर्या आणि जावई धनुष हे उपस्थित होते. रजनीकांत यांना हा पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांनी भाषणादरम्यान अनेकांचे आभार मानले. तसेच त्यांनी हा पुरस्कार गुरु के. बालाचंद्र यांना अर्पण करत असल्याचे यावेळी सांगितले.
रजनीकांत यांनी ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ स्विकारल्यानंतर भाषणादरम्यान त्यांच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी ते म्हणाले, “सिनेसृष्टीत महत्वाची कामगिरी करणाऱ्या अभिनेत्याला दरवर्षी दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केलं जाते. चित्रपटसृष्टीत प्रतिष्ठेचा मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याचा मला फार आनंद आहे. याबद्दल मी केंद्र सरकारचे आभार मानतो. मी हा पुरस्कार माझे गुरु के. बालाचंद्र यांना समर्पित करतो,” असे रजनीकांत म्हणाले.
“या क्षणी मला काही लोकांचा आभार व्यक्त करायचे आहेत ज्यांनी मला या संपूर्ण प्रवासात कायम साथ दिली. माझे भाऊ सत्यनारायण गायकवाड हे मला माझ्या वडिलांसारखा आहे. त्यांनी मला उत्तम संस्कार आणि अध्यात्म्याची शिकवण देऊन माझी वाढ केली. यासोबत कर्नाटकातील माझा मित्र आणि सहकारी राजबहादूर जो बस ड्रायव्हर असून त्याचेही मी आभार मानू इच्छितो. कारण मी जेव्हा बसमध्ये कंडक्टर होतो, त्यावेळी त्यानेच माझ्यातील अभिनय कौशल्य ओळखले आणि मला चित्रपटात जाण्यासाठी प्रोत्साहन दिले. या सर्वांना मी माझा हा पुरस्कार समर्पित करतो,” असेही त्यांनी सांगितले.
“इतकंच नव्हे तर सर्व निर्माते, दिग्दर्शक, सहकलाकार, टेक्निशियन्स, वितरक, प्रदर्शक, मीडिया आणि माझे चाहते, तामिळ भाषिक लोक या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो. त्यांच्याशिवाय मी काहीही नाही,” असेही ते म्हणाले. या पुरस्कार सोहळ्यादरम्यान अभिनेते रजनीकांत यांना उपस्थितांनी उभे राहून मानवंदना देत सन्मानित केले.
कंगना रनौतला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार
रजनीकांत यांच्यासोबत अभिनेत्री कंगना रनौतला दोन चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यावेळी कंगनाला ‘मणिकर्णिका’ आणि ‘पंगा’ या चित्रपटातील अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच अक्षय कुमारच्या केसरी या चित्रपटातील ‘तेरी मिट्टी’ या गाण्याचे पार्श्वगायक बी प्राक यांना या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर हिंदी चित्रपट विभागात दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या ‘छिछोरे’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार मिळाला. तसेच अभिनेता मनोज बाजपेयी आणि दाक्षिणात्य अभिनेता धनूष या दोघांना विभागून सर्वोत्कृष्ट अभिनेता हा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. हे सर्व पुरस्कार उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.