दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते रजनीकांत हे नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असतात. रजनीकांत यांना परफेक्ट फॅमिली मॅन म्हणून ओळखले जाते. ते नेहमी त्यांची पत्नी आणि दोन मुलींसह फोटो शेअर करत असतात. ऐश्वर्या आणि सौंदर्या अशी त्यांच्या दोन मुलींची नावं आहेत. नुकतंच रजनीकांत हे पुन्हा एकदा आजोबा झाले आहेत. रजनीकांत यांची मोठी मुलगी सौंदर्या ही दुसऱ्यांदा आई झाली आहे. तिने नुकतंच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे.

रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या हिने नुकतंच ट्विटरवर याबाबत एक ट्वीट केले आहे. याद्वारे तिने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. सौंदर्याने काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोसोबतच तिने तिच्या नवजात बाळाचा एक फोटोही पोस्ट केला आहे. त्याला कॅप्शन देताना ती म्हणाली, “देवाच्या आणि आमच्या आई-वडिलांच्या आशीर्वादाने आम्ही आज (११ सप्टेंबर) वीर रजनीकांत वनगमुंडी याचे स्वागत करतो.”

सौंदर्याने तिच्या बाळाचा चेहरा दाखवलेला नाही. मात्र तिने त्या बाळाचा हात पकडताना फोटो शेअर केला आहे. तर दुसऱ्या एका फोटोत तिने तिच्या कुटुंबाचा फोटो शेअर केला आहे. त्यानंतर तिने बेबी बंपसोबतचा फोटो शेअर केला आहे. तर चौथ्या फोटोत तिने तिचा पहिला मुलगा वेदसोबतचा फोटो पोस्ट केला आहे.

दरम्यान रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या आणि विशगन यांचे लग्न २०१९ मध्ये झाले होते. हे तिचे दुसरे अपत्य आहे. यापूर्वी सौंदर्याचा विवाह अश्विन रामकुमारशी झाला होत. तिच्यापासून सौंदर्याला वेद हा पहिला मुलगा आहे. तिच्या या ट्विटरवर अनेकांनी तिचे अभिनंदन केले आहे. अभिनेता अभिषेक बच्चन यानेही त्यावर कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. या गुडन्यूजनंतर अनेकजण रजनीकांत आणि त्यांच्या मुलीचे कौतुक करत आहेत.