सुपरहिरोपट, साय-फाय चित्रपट बनवणे हे आपल्याकडे अजूनही आर्थिकदृष्टय़ा आव्हान आहे. ‘रा. वन’ केल्यानंतर स्वत:ची व्हीएफएक्स कंपनी असूनही शाहरूख खानने अजूनपर्यंत तसा चित्रपट बनवण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. या पाश्र्वभूमीवर सातत्याने मोठय़ा प्रमाणावर व्हीएफएक्स तंत्राचा वापर करून चित्रपट देणाऱ्या दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता रजनीकांत यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. २०१० साली आलेल्या ‘रोबोट’ या रजनीपटाच्या सिक्वलसाठी तब्बल साडेतीनशे कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून पूर्णत: थ्रीडी स्वरूपात याचे चित्रिकरण करण्यात येणार आहे. मात्र, आता या खर्चात अजून ५० कोटींची भर पडल्याचे समोर आले आहे. या चित्रपटाचा खर्च आता ४०० कोटींच्या घरात गेल्याचे कळते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘एन्थिरन’चा सिक्वल असलेल्या ‘२.०’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात अव्वज दर्जाचे ग्राफिक्स वापरले जाणार आहेत. त्यामुळे चित्रपटाचा खर्च ४०० कोटी इतका झाला आहे. त्यामुळे, या चित्रपटाने आता राजमौली यांच्या ‘बाहुबली २’ या चित्रटालाही मागे टाकले आहे. ‘बाहुबली २’चा खर्च २५० कोटी असून तो आतापर्यंतचा सर्वाधिक खर्चिक चित्रपट असल्याचे म्हटले जात होते. ‘बाहुबली’ आणि ‘एन्थिरन’ या चित्रपटांच्या वीएफएक्सचे काम पाहणारे डिझायनर व्ही श्रीनावासन म्हणाले की, ‘२.०’ मध्ये आतापर्यंत कधीही न वापरले गेलेले वीएफएक्स पाहावयास मिळणार आहेत. तसेच, हॉलीवूडमधील स्टंट कोरिओग्राफर केन्नी बेट्स या चित्रपटातील काही अॅक्शन सीन्सवर काम करणार आहे. हॉलीवूडमधील ‘पर्ल हर्बर’, ‘ट्रान्सफॉरमर्स’ आणि ‘डाय हार्ड’ या हिट चित्रटांसाठी केन्नी ओळखला जातो.

[jwplayer NiU9fgbo]

काही दिवसांपूर्वीच ‘२.०’ या सिक्वलचा फर्स्ट लुक खुद्द रजनीकांत यांच्या उपस्थितीत प्रकाशित झाला. हिंदी चित्रपट अभिनेता अक्षय कुमार या सिक्वलपटात पहिल्यांदाच खलनायक म्हणून रजनीकांत यांच्यासमोर उभा ठाकणार आहे. केवळ या फर्स्ट लूक लाँचसाठी तब्बल सहा कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. चित्रपटाच्या निर्मिती संस्थेनेही प्रमोशनकरिता आधीच ४० कोटी रुपये टाकले आहेत. या चित्रपटात हॉलीवुडपटांच्या दर्जाचे व्हीएफएक्स तंत्रज्ञान वापरण्यात येणार असल्यानेच खर्चाचा आकडा मोठा असल्याचे रजनीकांत यांनी यावेळी स्पष्ट केले होते. ‘रोबोट’ या त्यांच्या पहिल्या चित्रपटाने तिकीटबारीवर कमाईचे विक्रम मोडले होते. त्यानंतर आलेल्या ‘कोचडियान’ला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही पण ‘रोबोट २.०’बद्दल लोकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.

विशेष म्हणजे या चित्रपटात अभिनेता रजनीकांत तिहेरी भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तसेच या चित्रपटात अक्षयकुमार एका वेगळ्या रंगभूषेत दिसणार आहे. विज्ञानकथा असलेल्या या चित्रपटात रजनीकांत यांनी शास्त्रज्ञ आणि रोबोट अशा दोन भूमिका केल्या होत्या. चित्रपटाच्या पुढील भागात रजनीकांत आणखी एका भूमिकेत दिसतील. मूळ रोबोटला नष्ट करण्यासाठी चित्रपटातील शास्त्रज्ञ आणखी एक नवीन रोबोट तयार करतो. या नव्या रोबोटची भूमिकाही रजनीकांत करणार आहेत. या चित्रपटात अक्षयकुमार खलनायकाच्या भूमिकेत असून त्याच्या या भूमिकेविषयी आणि रंगभूषेबाबत चित्रपटसृष्टीत चर्चा सुरू आहे. अक्षयकुमार पहिल्यांदाच अशा वेगळ्या गेटअपमध्ये प्रेक्षकांसमोर येणार आहे.

[jwplayer Gh3BZqOA]

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajinikanths 2 0 budget hiked to rs 400 crore makers pump in additional rs 50 cr
First published on: 03-12-2016 at 15:21 IST