सध्या सुरू असलेल्या राजकारणावर मार्मिक आणि खुसखुशीत भाष्य करणाऱ्या ज्येष्ठ ग्रामीण लेखक रा. रं. बोराडे यांच्या ‘अगं अगं मिशी’ या कथेवर आधारित ‘राजकारण गेलं मिशीत’ हा चित्रपट १९ एप्रिलपासून राज्यभरात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि अभिनय अशी दुहेरी जबाबदारी प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी सांभाळली आहे.

सध्या देशभरात निवडणुकीचं वातावरण तापलं आहे. राज्यात तर निवडणूक, उमेदवारांचा घोडेबाजार या सगळ्याला ऊत आला आहे. या वातावरणात प्रेक्षकांना मनसोक्त हसवणारा आणि त्यांना विचार करायला लावणारा असा ‘राजकारण गेलं मिशीत’ हा चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्मिती बकुळी क्रिएशन्सची असून पटकथा आणि संवाद योगेश शिरसाठ यांचे आहे. मकरंद अनासपुरे या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. अनासपुरे यांनी याआधीही ‘खुर्ची सम्राट’, ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’, ‘पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा’ असे मार्मिक विनोदी राजकीय चित्रपट केले आहेत आणि ते यशस्वीही झाले आहेत. हाही चित्रपट आत्ता राज्यात रंगलेल्या निवडणूक नाट्याच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित होतो आहे. खुसखुशीत आणि हलक्याफुलक्या मांडणीतील या राजकीय चित्रपटाला आपल्या आधीच्या चित्रपटांसारखाच प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळेल, असा विश्वास मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा >>>अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘राजकारण गेलं मिशीत’ या चित्रपटात मकरंद अनासपुरे यांच्याबरोबर प्राजक्ता हणमघर, प्रकाश भागवत, डॉ. विजय देशमुख, डॉ. राजू सोनावणे, नितीन कुलकर्णी, बाळू मुकादम, प्रशांत जाधव, विनीत भोंडे, हरीश तिवारी, श्वेता पारखे, उन्नती कांबळे, रेश्मा राठोड, शैलेश रोकडे आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. चित्रपटाचं छाया दिग्दर्शन सुरेश देशमाने यांनी केलं असून संकलन अनंत कामथ यांनी केलं आहे.