दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन अक्किनेनीचा मुलगा नागाचैतन्य आणि अभिनेत्री समांथा यांनी घटस्फोट घेतल्याचे सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले. त्यांच्या या निर्णयानंतर अनेकांना धक्का बसला. दरम्यान, चित्रपट निर्माता राम गोपाल वर्माने केलेल्या ट्वीटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांनी ट्वीटमध्ये ‘घटस्फोट तर स्वर्गातच ठरलेले असतात’ असे म्हटले आहे.
राम गोपाल वर्मा यांनी केलेले ट्वीट हे सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. ‘लग्नगाठी या नरकात बांधलेल्या असतात तर घटस्फोट हे स्वर्गातच ठरलेले असतात’ या आशयाचे ट्वीट राम गोपाल वर्मा यांनी केले आहे.
आणखी वाचा : समांथा आणि नागाचैतन्यच्या घटस्फोटावर नागार्जुनची प्रतिक्रिया, म्हणाला…
काय होती समांथा आणि नागाचैतन्यची पोस्ट?
समांथा आणि नागा चैतन्यने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत विभक्त होत असल्याचा निर्णय जाहीर केलाय. “आमच्या सगळ्या हितचिंतकांसाठी, बराच विचार केल्यानंतर मी आणि चै(नागा चैतन्य)ने पती-पत्नीच्या नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या १० वर्षांपासून आम्ही खूप चांगले मित्र-मैत्रिण आहोत आणि आमच्यात असलेल हे नात कायम राहिलं. आम्ही आमच्या चाहत्यांना आणि माध्यमांना विनंती करतो की या कठीण काळात ते आम्हाला पाठिंबा देतील आणि आम्हाला प्रायव्हसी द्याल. तुम्ही दिलेल्या पाठिंब्यासाठी धन्यवाद,” अशा आशयाची पोस्ट समांथा आणि नागा चैतन्याने केलीय.
ऑक्टोबर २०१७ मध्ये विवाहबंधनात
२००९ मध्ये ‘ये माया चेसावे’ या तेलुगू चित्रपटाच्या सेटवर समांथा व नागा चैतन्यची पहिली भेट झाली. त्यावेळी नागा चैतन्य कमल हासन यांची मुलगी श्रुती हसनला डेट करत होता. तर दुसरीकडे समांथा व ‘रंग दे बसंती’ फेम अभिनेता सिद्धार्थ रिलेशनशीपमध्ये होते. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान समांथा व नागा चैतन्यमध्ये चांगलीच मैत्री झाली.
२०१५ मध्ये ‘ऑटोनगर सूर्या’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जेव्हा हे दोघं पुन्हा भेटले तेव्हा दोघांचाही ब्रेकअप झाला होता. याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान समांथा व नागा चैतन्य एकमेकांच्या प्रेमात पडले असं म्हटलं जातं. ऑक्टोबर २०१७ मध्ये हे दोघं विवाहबंधनात अडकले होते. आता त्यांनी घटस्फोट घेतला आहे.