लॉकडाउनच्या काळात प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी रामायण आणि उत्तर रामायण या दोन्ही मालिकांचं दूरदर्शन या वाहिनीवर पुन्हा प्रसारित करण्यात आल्या. या मालिकांमुळे प्रेक्षकांचं मनोरंजन तर झालंच. पण ही मालिका त्यांना जुन्या आठवणींमध्येही घेऊन गेली. सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये एकाच कुटुंबात राहणाऱ्या सदस्यांना एकमेकांशी बोलायला किंवा एकत्र मिळून जेवायलाही वेळ नसतो. मात्र या मालिकेमुळे बऱ्याच कुटुंबातील सदस्य पुन्हा जोडले गेले. अनेक जण घरात एकत्र बसून ही मालिका पाहून लागले. त्यामुळे या मालिकेचे नेटकऱ्यांनी मनापासून आभार मानले आहेत. सध्या सोशल मीडियावर एक नवा हॅशटॅग ट्रेण्ड होत असून ते दूरदर्शनचे आभार मानत आहेत.

श्री रामाच्या जीवनावर आधारित रामायण या मालिकेची निर्मिती रामानंद सागर यांनी केली. १९८७ साली ही मालिका पहिल्यांदा प्रेक्षकांच्या भेटीला आली. त्याकाळी ही मालिका तुफान लोकप्रिय झाली होती. विशेष म्हणजे आज ३३ वर्षांनीदेखील तिची क्रेझ किंचितही कमी झालेली नाही. आजही या मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. त्यामुळेच लॉकडाउनच्या काळात ही मालिका पाहायला मिळाल्याने नेटकऱ्यांनी दूरदर्शनचे आभार मानले आहेत. इतकंच नाही तर ट्विटरवर #ThankYouRamayan  हा हॅशटॅगही व्हायरल झाला आहे.

दरम्यान, लॉकडाउनच्या काळात रामायण प्रसारित झाल्यापासून लोकप्रियतेत प्रथम स्थानावर आहे. या मालिकेने १६ एप्रिल रोजी टीआरपीचा विश्वविक्रम केला. ७.७ कोटी व्ह्यूअर्स या मालिकेला मिळाले. तर १९८७ ते १९८८ या कालावधीत ही मालिका सर्वाधिक पाहिली गेली होती.