लॉकडाउन असल्यामुळे सध्या घरात अडकलेल्या नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी दूरदर्शनने ९०च्या दशकातील मालिका पुन्हा सुरु केल्या आहेत. यामध्ये पहिल्या आठवड्यापासून रामानंद सागर यांची ‘रामायण’ ही मालिका टीआरपीमध्ये वरच्या स्थानावर आहे. ही मालिका पुन्हा एकदा सुरु झाल्यामुळे यातील कलाकारही सोशल मीडियावर ट्रेण्ड होत आहेत. यामध्येच मालिकेत सीतेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलियादेखील इन्स्टाग्राम, ट्विटरच्या माध्यमातून आता चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्येच त्यांनी एक थ्रोबॅक फोटो शेअर केला असून यात त्यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसून येत आहेत.

९० च्या दशकात रामायणमध्ये सीता ही भूमिका साकारल्यामुळे अभिनेत्री दीपिका चिखलिया चांगल्याच लोकप्रिय झाल्या होत्या. या मालिकेव्यतिरिक्त त्यांनी अनेक लोकप्रिय मालिकांमध्येही काम केलं होतं. त्याकाळी त्यांची तुफान क्रेझ होती. याच काळात त्या गुजरातमधील बडोदा येथून निवडणुकीसाठी उभ्या राहिल्या होत्या. त्यावेळीची एक आठवण म्हणून त्यांनी एक फोटो काढला होता. हा फोटो त्यांनी ट्विटरवर शेअर केला असून यात त्यांच्यासोबत पंतप्रधान मोदी दिसत आहेत.

दीपिका यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये त्यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते लाल कृष्ण अडवाणी, पंतप्रधान मोदी दिसून येत आहेत. ”ज्यावेळी मी बडोदामधून निवडणुकीसाठी उभी राहिले होते. त्याकाळातला एक जुना फोटो. माझ्या डावेकडील बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी बसले आहेत. त्यांच्या बाजूला लाल कृष्ण अडवाणी ,मी आणि नलिन भट्ट”, असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं आहे.

दरम्यान,९० च्या काळात दीपिका यांची लोकांमध्ये तुफान क्रेझ होती. त्यामुळेच त्यांना १९९१ मध्ये भारतीय जनता पक्षाकडून निवडणुकीचं तिकीट देण्यात आलं होतं. त्या गुजरातमधील बडोदा येथून उभ्या राहिल्या होत्या. विशेष म्हणजे त्या बहुमताने विजयीदेखील झाल्या होत्या.