बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा आज वाढदिवस आहे. आज रणबीर त्याच्या कुटुंबासोबत ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. रणबीर हा दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांचा मुलगा आहे. रणबीरने संजय लीला भंसाली यांच्या २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सावरिया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. रणबीर त्याच्या चित्रपटांमुळेच नाही तर त्याच्या खासगी आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत असतो.

ऋषी आणि रणबीर या दोघांमध्ये असलेले बाप-लेकाचे संबंध काही ठीक नव्हते. या विषयी ऋषी यांनी एका मुलाखतीत खुलासा केला होता. २०१५ मध्ये ‘मुंबई मिरर’ला दिलेल्या मुलाखतीत ऋषी यांनी त्यांचे आणि रणबीरचे संबंध कसे आहेत हे सांगितले. “लग्नानंतर वेगळ्या घरात राहण्यासाठी माझ्या वडिलांनी मला परवानगी दिली होती. तर, रणबीरला मी वेगळं होण्याची परवानगी तेव्हा दिली जेव्हा त्याने त्याच्या गर्लफ्रेंडसोबत एका घरात राहण्याचा निर्णय घेतला होता. या घरात त्याच्यासाठी एक खोली होती, पण ३३ वर्षाच्या मुलासाठी ते पुरेसे कसे असू शकते? तो एक चांगला मुलगा आहे, तो माझ्या सगळ्या गोष्टी ऐकतो पण मी त्याच्या करिअर विषयी काही सांगत नाही. कारण माझं करिअर माझं आहे आणि त्याचं करिअर त्याचं. मला माहित आहे की, मी रणबीरसोबतचे माझे संबंध खराब केले. ते बदलण्यासाठी आता खूप उशीर झाला आहे. आता आम्ही दोघे ही ते ठीक करू शकणार नाही. जणू काही तिथे एक काचेची भिंत आहे, आपण एकमेकांना पाहू शकतो, बोलू शकतो, पण तेवढंच त्यापुढे काही नाही. तो आता आमच्यासोबत राहत नाही, ज्याने नीतू आणि मला खूप मोठा धक्का बसला आहे. आम्ही एक नवीन घर बांधत आहोत जिथे त्याच्यासाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी भरपूर जागा असेल. तोपर्यंत आयुष्य हे थांबत नाही,” असे ऋषी म्हणाले.

आणखी वाचा : समांथाच्या घटस्फोटाच्या चर्चांमध्ये चाहत्यांना मिळाली आनंदाची बातमी

२०१८ मध्ये जेव्हा ऋषी कपूर यांचे कर्करोगाचे निदान झाले, तेव्हा त्यांचे सगळ्यात चांगले उपचार व्हावे म्हणून रणबीरने त्यांना न्युयॉर्कला नेण्याचा निर्णय घेतला होता. या विषयी एका मुलाखतीत ऋषी म्हणाले होते की, “मी दिल्लीत चित्रीकरण करत होतो. चित्रीकरणाचा माझा ६ वा दिवस होता. त्यावेळी माझा मुलगा रणबीर आणि आमच्या कुटुंबाच्या जवळची एक व्यक्ती दिल्लीत आले आणि त्यांनी निर्मात्यांना या विषयी सांगितले. संध्याकाळपर्यंत त्यांनी मला मुंबईला आणले आणि थोड्याच वेळात त्यांनी मला न्युयॉर्कला नेले. यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यासाठी माझ्याकडे वेळ नव्हता. माझ्या मुलाने अक्षरश: जबरदस्तीने मला विमानात बसवले आणि माझ्याबरोबर इथे आला.” एप्रिल २०२०मध्ये ऋषी कपूर यांचे निधन झाले.