बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रणबीरने स्त्रीप्रमाणे श्रृंगार केलेला दिसतो. पण हा श्रृंगार खरा नसून मोबाइलमधील एका मोबाईल अॅपच्यासहाय्याने त्याने हा खोटाखोटा श्रृंगार साकारला आहे. स्नॅपचॅट अथला असाचप्रकारची अन्य अॅप्लिकेशन वापरून असा खोटा श्रुंगार साधता येतो. रणबीरचा हा व्हिडिओ सावन अॅपवर पाहाता येईल.

नवरीच्या वेशात दिसणाऱ्या रणबीरच्या नाकात नथ आणि बिंदी पाहायला मिळते. एवढेच नव्हे तर त्याच्या कानात झुमकेही दिसतायेत. रणबीर लवकरच त्याचा आगामी सिनेमा ‘ब्रम्हास्त्र’च्या चित्रीकरणाला सुरूवात करणार आहे. करण जोहरची निर्मिती असलेल्या या सिनेमात अमिताभ बच्चन आणि आलिया भट्ट यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अयान मुखर्जी दिग्दर्शित हा सिनेमा एक ‘फँटसी अॅडव्हेंचर ट्रायोलॉजी’ असणार आहे. १५ ऑगस्ट २०१९ ला हा सिनेमा प्रदर्शित होईल.

काही दिवसांपूर्वी आलियाने तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोमध्ये ती ‘ब्रम्हास्त्र’ची संहिता वाचताना दिसत होती. या सिनेमाची अधिकृत घोषणा ११ ऑक्टोबरला महानायक अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवशी करण्यात आली होती.

या सिनेमाबद्दल बोलताना रणबीर म्हणाला की, ‘हा अयानचा सिनेमा आहे. या सिनेमातून मी पहिल्यांदा आलियासोबत काम करणार आहे. ती सर्वात तरुण गुणी अभिनेत्री आहे. ती १० वर्षांची असतांना आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो.’