राज्यभरात २४ नोव्हेंबरपासून प्राथमिक फेरी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घाशीराम कोतवाल, तीन पशाचा तमाशा, पडघम, लेकुरे उदंड झाली.. या नाटकांमध्ये काय साम्य आहे? ही नाटकं रूढार्थानं संगीत नाटकं नाहीत. मात्र, संगीत हा या नाटकांचा आत्मा आहे. संगीत नाटकाच्या परंपरेला वेगळा आयाम देण्याचं काम थिएटर अ‍ॅकॅडमी या संस्थेनं केलं. आताच्या आधुनिक काळात संगीत नाटकाला पुन्हा नवजीवन देण्यासाठी, संगीत नाटकाची नवी रंगभाषा निर्माण करण्यासाठी थिएटर अ‍ॅकॅडमीनं पुढाकार घेऊन सुरू केलेली ‘रंगसंगीत’ ही संगीत एकांकिका स्पर्धा यंदा २४ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर दरम्यान रंगणार आहे. या स्पध्रेमुळे संगीत एकांकिका किंवा संगीत नाटक ही संकल्पना नव्या पिढीच्या रंगकर्मीना अधिक स्पष्ट झाली असून, लोककला आणि आधुनिक संगीताच्या माध्यमातून संगीत एकांकिका केल्या जात आहेत. संगीत नाटकाचं पुनरुज्जीवन होण्याच्या दृष्टीनं हे सुचिन्ह आहे.

संगीत नाटकांची परंपरा टिकवायची असेल तर ती अभिनव कल्पनांमुळेच टिकेल, या विचारातून थिएटर अ‍ॅकॅडमीने व्होडाफोनच्या सहकार्याने ‘रंगसंगीत’ या संगीत एकांकिका स्पध्रेची आठ वर्षांपूर्वी सुरुवात केली. संगीत एकांकिका स्पध्रेला जोडूनच गद्य एकांकिकांसाठीही स्वतंत्र स्पर्धा घेतली जाऊ लागली. मात्र, संगीत एकांकिका हा विचारच मुळात अभिनव होता. त्यामुळे गेल्या आठ वर्षांमध्ये या स्पध्रेनं राज्यभरातील नाट्य संस्था आणि रंगकर्मीमध्ये चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. संगीत एकांकिका म्हणजे काय याची संकल्पना रंगकर्मीना नीट समजू लागली आहे. म्हणूनच संगीत एकांकिकांमध्ये लक्षणीय प्रयोग होत असल्याचं दिसून येत आहे. यंदा राज्यभरातील विविध केंद्रांवर २४ नोव्हेंबरपासून प्राथमिक फेरी होणार आहे. पुण्यातील प्राथमिक फेरी ९ व १० डिसेंबर रोजी होणार आहे, तर अंतिम फेरी १४ ते १६ डिसेंबर दरम्यान पुण्यात होणार आहे. गेल्या आठ वर्षांमध्ये संगीत एकांकिकांमध्ये होणाऱ्या प्रयोगांविषयी थिएटर अ‍ॅकॅडमीचे अध्यक्ष प्रसाद पुरंदरे यांनी माहिती दिली. ‘‘रंगसंगीत’ या स्पध्रेमुळे संगीत नाटक म्हणजे काय, हे रंगकर्मीना अधिक स्पष्टपणे कळू लागल्याचं त्यांच्या नाटकांतून दिसतं. कारण, केवळ शास्त्रीय संगीतावर आधारित संगीत एकांकिकांपेक्षा लोककला किंवा आधुनिक संगीताचा एकांकिकांमधील वापर वाढला आहे. त्यातून या रंगकर्मीच्या नव्या जाणीवा दिसतात. अगदी पारंपरिक दशावतारापासून रॉक संगीतापर्यंतचा वापर संगीत एकांकिकामध्ये होतो. नवी पिढी पारंपरिक लोककला प्रकारांचा गांभीर्यानं विचार करू लागली आहे. त्यात प्रयोग करू लागली आहे. आपली नाटय़परंपरा पुढे जाण्याच्या दृष्टीनं, नवं काहीतरी घडण्याच्या दृष्टीनं हे नक्कीच महत्त्वाचं आहे. रंगसंगीतमधील एकांकिका आता व्यावसायिक रंगभूमीवरही येऊ लागल्या आहेत.’

‘थिएटर अ‍ॅकॅडमी पुण्यात सकळ ललित कलांना सामावून घेण्यासाठी खास संकुलाची उभारणी करत आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या संकुलाचा वापर रंगसंगीत एकांकिका स्पध्रेसाठी होईलच; त्याशिवाय संगीत नाटकाशी संबंधित नवे प्रयोगही या ठिकाणी करण्याची कल्पना आहे. सकळ ललित कला संकुल संगीत नाटक आणि एकूणच रंगभूमीसाठी नक्कीच फलदायी ठरेल, याची खात्री आहे,’ असंही पुरंदरे यांनी सांगितलं.

रंगसंगीत या स्पध्रेतील संगीत आणि गद्य विभागात सहभाग घेण्यासाठी २४ नोव्हेंबर ही अंतिम मुदत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- ९१५८८६७११, theatreacademypune@gmail.com

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rangasangeet ekankika spardha in pune
First published on: 23-11-2017 at 05:15 IST