बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी लवकरच तिच्या आगामी ‘मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. ‘मेरे दाद की मारुती’ या चित्रपटातून आपली छाप पाडणाऱ्या दिग्दर्शिका आशिमा छिब्बर या राणीच्या आगामी चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. एका देशाविरुद्ध एका आईच्या संघर्षावर आधारित हा चित्रपट असणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगसाठी राणी मुखर्जी परदेशात रवाना झाली आहे.

अभिनेत्री राणी मुखर्जी अखेरीस 2019 मध्ये रिलीज झालेल्या ‘मर्दानी 2’ या अॅक्शन ड्रामा चित्रपटात दिसली होती. येत्या काही दिवसांमध्ये राणी मुखर्जी ‘मिसेस चॅटर्जी वि नॉर्वे’चं शूटिंग सुरू करणार आहे. यासाठी ती एका महिन्यापेक्षा जास्त काळ देशाबाहेर असणार आहे.

‘मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे’मध्ये आपल्या भूमिकेसाठी अभिनेत्री राणी मुखर्जीने बरीच मेहनत घेतलीय. २०११ मध्ये नॉर्वे देशातील भारतीय वंशाच्या जोडप्यासोबत घडलेल्या खऱ्या घटनेवर आधारित तिचा हा चित्रपट असणार आहे. यात नॉर्वेजियन अधिकारी जोडप्याच्या मुलांना त्यांच्यापासून वेगळे करतात.

या चित्रपटाबद्दल बोलताना राणी मुखर्जी एका मुलाखतीत म्हणाली होती, “’मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे’ ही सत्य घटनेवर आधारित कथा आहे आणि हा चित्रपट तेथील सर्व मातांना समर्पित करणारा आहे. बर्‍याच दिवसांपासून वाचलेल्या सर्वात आश्चर्यकारक घटनेवर आधारित हा चित्रपट असल्यामुले मी लगेच या चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला.”

2019 मध्ये रिलीज झालेल्या ‘मर्दानी 2’ नंतर ‘मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे’ हा राणी मुखर्जीचा पहिला चित्रपट असणार आहे. या चित्रपटाची निर्मिती एम्मी एंटरटेनमेंट आणि झी स्टुडिओजचे निखिल अडवाणी करत आहेत. राणी मुखर्जी सध्या ‘बंटी और बबली 2’ च्या रिलीजची वाट पाहत आहे. तिचा हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज झाला असून महामारीमुळे याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती.