Ratna Pathak : हिंदी चित्रपटसृष्टी, समांतर सिनेमा, हिंदी रंगभूमी आणि मालिका विश्वातील एक प्रसिद्ध नाव म्हणजे अभिनेत्री रत्ना पाठक. रत्ना पाठक यांनी हिंदी रंगभूमीवर नाटक करणं कठीण आहे आणि त्याचं कारण नाटकाला फुकट पास घेऊन येणारे प्रेक्षक आहेत असं म्हटलं आहे. रत्ना पाठक यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओत त्यांनी नाटकाला फुकट पास मागणाऱ्या प्रेक्षकांबाबत त्यांनी परखड मत व्यक्त केलं आहे.

रत्ना पाठक या गेल्या चार दशकांहून अधिक काळ कार्यरत

रत्ना पाठक शाह या उत्तम अभिनेत्री आहेत. हरहुन्नरी अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्या त्या पत्नी आहेत. तर अभिनेत्री सुप्रिया पाठक आणि रत्ना पाठक या दोघीही सख्ख्या बहिणी आहेत. रत्ना पाठक या साराभाई व्हर्सेस साराभाई या मालिकेतून घराघरात पोहचल्या. माया साराभाई हे त्यांनी साकारलेलं पात्र आजही लोकांच्या स्मरणात आहे. रत्ना पाठक यांनी सगळ्या माध्यमांमध्ये काम केलं आहे. दरम्यान नाटक हे आपलं वेड आहे आणि हल्ली नाटकवेडे लोक किंवा ज्यांच्याकडे खूप पैसे आहेत असेच लोक नाटक करतात असं त्यांनी म्हटलं आहे.

रत्ना पाठक शाह नेमकं काय म्हणाल्या?

“नाटक करणं ही खूपच कठीण गोष्ट आहे. त्यामुळे ज्यांना नाटकाचं वेड आहे असंच लोक नाटक सादर करतात किंवा असे लोक नाटक करतात जे भरपूर पैसे कमवू शकतात. ज्यांच्या मागे कुणाचा तरी मोठा हात असेल तर असे कलाकार नाटक करतात. कायमच या गोष्टी घडत आल्या आहेत. आम्हाला नाटकाचं वेड आहे त्यामुळे आम्ही तशाच पद्धतीने नाटक सादर करतो. नाटकाचा शो फुकट असेल तर प्रेक्षक येतात. पासेस असतील तर प्रेक्षक येतात. सिनेमासाठी पैसे मोजतात. पीव्हीआरमध्ये किती पैसे मोजतात? एका तिकिटासाठी किती पैसे तुम्ही मोजता? चांगलेच मोजता ना? पण नाटकासाठी ते पैसे खर्च करत नाहीत. मी माझ्या मित्र-मैत्रिणींचं उदाहरण देते. आम्ही (मी आणि नसीर) जेव्हा दिल्लीत नाटक करण्यासाठी येतो तेव्हा आमच्याच मित्र-मैत्रिणींपैकी अनेक जण सांगतात वुई आर डाईंग टू सी यू ऑन स्टेज. पण जरा तिकिटं संपली आहेत, काहीतरी करता येईल का? जर तुम्ही वाट बघत होतात की आमचं नाटक येईल तर आधीच तिकिटं का खरेदी केली नाहीत? तुम्हाला हे वाटत असतं की फुकट पास मिळेल. असं परखड मत रत्ना पाठक यांनी व्यक्त केलं आहे. या संदर्भातला त्यांचा व्हिडीओही चर्चेत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रत्ना पाठक यांच्या व्हिडीओवर विविध प्रतिक्रिया

अनेकांनी रत्ना पाठक यांच्या या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत. तुम्ही म्हणत आहात ते खरं आहे. नृत्य किंवा तसा कुठलाही कलेशी संबंधित कार्यक्रम असेल तरीही लोकांना फुकट पास हवे असतात. पुस्तकांचीही अवस्था काही फार वेगळी नाही. पुस्तकं कुणीही विकत घेऊन वाचत नाही असंही काहींनी यावर कमेंट करत म्हटलं आहे. आदित्य आठवले नावाच्या युजरने म्हटलं आहे मराठी नाटकांना पैसे खर्च करुन लोक येतात. तुम्ही तुमच्या नाटकांमध्ये सातत्य ठेवलं पाहिजे. तुमच्यासारख्या सशक्त अभिनेत्रीकडून ती अपेक्षा आम्हाला आहे.