वेगवेगळ्या कथाविषयांच्या चित्रपटांमुळे आणि हटके जोड्यांमुळे मराठी चित्रपट लक्षवेधी ठरतात. रुपेरी पडद्यावर प्रथमच एकत्र येणाऱ्या जोडीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पहाण्याचं कुतूहल प्रेक्षकांनाही असतं. ‘रौद्र’ या आगामी मराठी चित्रपटातही अशीच एक नवी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ही जोडी आहे राहुल पाटील आणि उर्मिला जगताप यांची… ही नवी जोडी प्रेक्षकांची मन जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे.
‘रौद्र’ या चित्रपटाच्या निमित्ताने हे दोघे प्रथमच एकत्र आले असून स्वातंत्र्योत्तर काळातील पटकथा असलेल्या या चित्रपटात वेगळ्या धाटणीची व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळणं हे खरंच आम्हाला सुखावणारी बाब असल्याचे राहुल आणि उर्मिलाने सांगितले आहे. या चित्रपटाची कथा रहस्यभेदाभोवती फिरते. एका पुरातन अमूल्य अशा गोष्टीच रहस्य जाणून घेण्यासाठी गावात आलेला अभिनेता तिथल्या अभिनेत्रीच्या मदतीने त्याचा शोध घेऊ पाहतो. त्रिंबक कुरणे आणि मृण्मयी कुलकर्णी या व्यक्तिरेखा आम्ही साकारत आहोत. प्रेमाच्या उत्कटतेनं सर्व मर्यादा ओलांडून हे दोघे आपलं प्रेम मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. पण नंतर, काही घटना आणि गोष्टी अशा घडतात की, त्यातून विनाशाचं ‘रौद्र’ रूप समोर येतं. हे रूप नेमकं कोणाचं असणार? याची रंजक तेवढीच थरारक कथा म्हणजे ‘रौद्र’ हा चित्रपट.
या दोघांसोबत दीपक दामले, अनिता कोकणे, अमित पडवणकर, ईशान गटकळ आदि कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत. चित्रपटाची कथा मंगेश बाळासाहेब गटकळ यांची असून पटकथा आणि संवाद रविंद्र शिवाजी यांचे आहेत. मंगेश बाळासाहेब गटकळ या चित्रपटाचे निर्माते तर सहनिर्माते समीर किसन गाडे आहेत. हर्षद गोलेसर, वैष्णवी अडोदे, शुभांगी केदार, शिरीष पवार या गायकांनी यातील गाणी गायली आहेत. संगीताची जबाबदारी अक्षय जाधव यांनी सांभाळली आहे. छायांकन स्वप्निल केदारे आणि संकलन आकाश मोरे यांचे आहे. एम.जी पिक्चर्स निर्मित आणि रविंद्र शिवाजी लिखित-दिग्दर्शित ‘रौद्र’ हा चित्रपट १ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘अल्ट्रा मीडिया अॅन्ड एन्टरटेन्मेंट प्रा.लि’.कंपनीने ‘रौद्र’ चित्रपटाची प्रस्तुती केली आहे.
म्युझिक अल्बम, मालिका ते चित्रपट असा अभिनेत्री उर्मिला जगतापचा प्रवास आहे तर राहुल पाटील याने सुद्धा अल्बम आणि चित्रपटातून आपली ओळख निर्माण केली आहे. उर्मिलाने याआधी ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘स्पेशल पोलिस फोर्स’ या मालिका तसेच ‘एक सांगायचंय’, ‘ऊसान’ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘आम्ही बेफिकर’ या चित्रपटासोबत ‘इश्क हुआ रे’,‘बँडवाल्या बँड तुझा वाजू दे’ या अल्बम मध्ये राहुलने काम केलं आहे.