जेमतेम पंधरा पावसाळे पाहिलेली एक मराठी मुलगी रंगभूमीवर पहिलं पाऊल ठेवते. अन् पहाता पहाता भाषेची भिंत ओलांडून मुंबईच्या गुजराती, मारवाडी नाट्यसृष्टीत एक सुप्रसिद्ध गायिका – अभिनेत्री म्हणून मानाचं स्थान मिळवते. अशाच चाकोरीबाहेरच्या नाट्यसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव म्हणजे सुशीला लोटलीकर. मराठी, गुजराथी व मारवाडी रंगभूमीवर त्यांना वंदना मिश्र म्हणूनही ओळखले जाते. प्रतिकूल परिस्थितीशी झुंजणाऱ्या एका साध्या पण मानी कुटुंबाचा वारसा जपणाऱ्या वंदना मिश्र यांचा जीवनप्रवास खिळवून ठेवणारा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुरुवार २६ जानेवारीला सायंकाळी ४:३० वाजता प्रबोधनकार ठाकरे, मिनी थिएटर बोरिवली (प.) येथे त्यांच्या बहुचर्चित आणि रसिकांनी गौरविलेल्या ‘मी..मिठाची बाहुली’ या पुस्तकाच्या अभिवाचनाचा प्रयोग सादर होणार आहे. सुप्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री फैय्याज या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. अभिवाचनाची संकल्पना आणि दिग्दर्शन विश्वास सोहोनी यांची असून या खास कार्यक्रमाचे सादरीकरण उदय नेने आणि मानसी कुलकर्णी करणार आहेत.

वंदना मिश्र लिखित ‘मी.. मिठाची बाहुली’ या त्यांच्या मराठी आत्मचरित्रात त्यांच्या लिखाणातील जिव्हाळा आणि आपुलकीचे सहजसुंदर दर्शन घडते. पक्क्या मुंबईकर असलेल्या मिश्र यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातल्या मुंबईचे आणि तत्कालीन समाजजीवनाचे मनोहारी दर्शन ‘मी.. मिठाची बाहुली’ पुस्तकात पानोपानी घडविले आहे. १९४४ साली मुंबई गोदीत झालेला स्फोट, ‘चले जाव’ची चळवळ, स्वातंत्र्यासोबत आलेली फाळणी अशा अनेक महत्त्वाच्या घटनांचा दस्तावेज या आत्मचरित्रात आहे. या अभिवाचनातून मुंबईची जीवनमूल्य, श्रम–संस्कृती आणि सर्वसमावेशक माणुसकीवर आधारलेली जीवनशैली या वैशिष्ट्यांचा लेखिका वंदना मिश्र यांनी घेतलेला वेध श्रोत्यांना अनुभवता येईल. हा कार्यक्रम सर्व रसिक श्रोत्यांसाठी विनामूल्य असून कार्यक्रमाच्या सन्मानिका तीन दिवस आधीपासूनच उपलब्ध असतील.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Re reading of a book mi mithachi bahuli written by vandana mishra
First published on: 19-01-2017 at 17:45 IST