बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शिका आणि नृत्यदिग्दर्शिका फराह खानने नुकताच तिच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. त्या निमित्ताने फराहने तिच्या लग्नातील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. लग्नसोहळ्यातील फराहच्या संगीतचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. या फोटोंमुळे फराह आणि तिचा पती शिरिष यांच्या काही जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत असेच म्हणावे लागेल. फराहच्या या संगीतसोहळ्यामध्ये विविध बी टाऊन कलाकारांनीही हजेरी लावल्याचेही पाहायला मिळत आहे. अभिनेता शाहरुख खान, अभिषेक बच्चन, राणी मुखर्जी प्रियांका चोप्रा या कलाकारांचेही फोटो यामध्ये दिसत आहेत.
१२ वर्षांपूर्वीचे शाहरुख खान आणि गौरी खानचे हे फोटो अचानकपणे सोशल मीडियावर व्हायरल होण्यामागचे कारण काय? असाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत असतानाच हे स्पष्ट झाले की, फराह खानच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे फोटो शेअर केले जात आहेत. या फोटोंमध्ये हे बी टाऊन कलाकार फारच तरुण आणि वेगळे दिसत आहेत. फराहने हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट करत त्यासोबत धम्माल कॅप्शनही लिहिले आहेत. त्यापैकी एका फोटोमध्ये अभिनेता अभिषेक बच्चन, राणी मुखर्जीसुद्धा दिसत आहेत. त्यामुळे चाहत्यांनाही कलाकारांचे हे जुने फोटो पाहण्याची संधी मिळाली आहे.
अभिनेता शाहरुख खान आणि फराह खान हे हिंदी चित्रपटासृष्टीमध्ये एकमेकांचे खुपच चांगले मित्र आहेत. फराह आणि शाहरुखने एकत्र चित्रपटही केले आहेत. त्यामुळे या फोटोंच्या माध्यमातून कलाकारांच्याही जिन्या आठवणी ताज्या झाल्या असतील यात शंकाच नाही. दरम्यान अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या ‘रईस’ या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. चित्रपटातील त्याचा लूक आणि चित्रपटाच्या ट्रेलरमुळे सध्या प्रेक्षकांमध्येही त्याबाबत उत्सुकतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. या चित्रपटात शाहरुख त्याच्या नेहमीच्याच भूमिकांपेक्षा एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. २५ जानेवारी २०१७ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.