Chhaava Movie Trailer Controversy: अभिनेता विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाची अनेक अनेकांना प्रतिक्षा होती. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. मात्र या ट्रेलरमुळे आता नवा वाद निर्माण झाला आहे. चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज लेझीम खेळत नृत्य करताना दिसत असल्याबद्दल आक्षेप घेतला जात आहे. काही संघटनांनी याविरोधात आंदोलनही सुरू केले आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान केल्याबद्दल दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि निर्मात्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. आता यावर राज्य सरकारचे मंत्री आणि शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते उदय सामंत यांनी भूमिका मांडली आहे. त्यांनीही चित्रपटात योग्य ते बदल न केल्यास चित्रपट प्रदर्शित करु दिला जाणार नाही, असे सांगितले आहे.

मंत्री उदय सामंत यांनी एक्सवर आपली भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, “धर्मरक्षक, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपट बनणे ही आनंदाची गोष्ट आहे, छत्रपतींचा इतिहास जगाला समजावा यासाठी असे प्रयत्न आवश्यक आहेत. मात्र या चित्रपटात काही आक्षेपार्ह दृश्ये असल्याबाबत अनेकांनी मते व्यक्त केली आहेत. हा चित्रपट तज्ज्ञ आणि जाणकारांना आधी दाखवण्यात यावा त्याशिवाय प्रदर्शित करू नये अशी आमची भूमिका आहे.”

त्याशिवाय चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही

मंत्री उदय सामंत पुढे म्हणाले, “महाराजांच्या सन्मानाला बाधा पोहोचेल अशी कुठलीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही. चित्रपटाच्या निर्माते आणि दिग्दर्शकांनी तातडीने या बाबत उपाययोजना करून आक्षेपार्ह काही असेल तर काढून टाकलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. चित्रपट पाहून पुढील निर्णय घेतला जाईल, त्याशिवाय हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही!”

माजी खासदार संभाजीराजे भोसले यांचाही संताप

छावा चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई एकत्र नृत्य करताना दाखवले आहे. यावर माजी खासदार संभाजीराजे भोसले यांनीही काहीशी नाराजी व्यक्त केली. मात्र त्याचवेळी त्यांनी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचे कौतुकही केले. त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर एवढे मोठे बजेट असेलला चित्रपट काढला, त्याबद्दल त्यांचे कौतुक करतो, असेही ते म्हणाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“छावा या नावाने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर चित्रपट येत आहे. ही आनंदाची बातमी आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास यातून पुढे येईल. चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांची टीम मला येऊन भेटली होती. त्यांनी ट्रेलरची क्लिप मला दाखवली. पण मी त्यांना संपूर्ण चित्रपट दाखविण्याची मागणी केली होती. तसेच मी त्यांना काही इतिहासकार जोडून देणार होतो, जेणेकरून चित्रपटात एखादी चूक असेल तर ती दुरूस्त करता येईल. पण त्यांनी इतिहासकारांशी भेटण्यात स्वारस्य दाखवले नाही”, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.