छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस मराठी’ या रिअॅलिटी शोचे पहिले पर्व गाजवणारी अभिनेत्री म्हणजे रेशम टिपणीस. बिनधास्त आणि बेधडक व्यक्तव्यामुळे रेशमने अनेकांच्या मनात घर केले आहे. बिग बॉसनंतर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये तिचा मोठा चाहता वर्ग झाल्याचे पाहायला मिळते. रेशम नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना तिच्या आयुष्यातील गोष्टींबाबत सांगताना दिसते. आता रेशमच्या चाहत्यांसाठी खूशखबर आहे. ती लवकरच एका मराठी चित्रपटात झळकणार आहे. या विषयी खुद्द रेशमने माहिती दिली आहे.
रेशमने इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या आगामी चित्रपटाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती अभिनेता सिद्धार्थ जाधव, अंकुश चौधरी आणि सयाजी शिंदे यांच्यासोबत दिसत आहे. त्यामुळे या चित्रपटात हे कलाकार रेशमसोबत दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या चित्रपटाचे नाव अद्याप समोर आलेले नाही.
बर्मिंगहममध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असल्याचे रेशमने सांगितले आहे. त्यावेळी तेथे तापमान ३ अंश सेल्सिअस असल्याचे देखील रेशमने सांगितले आहे.दरम्यान तिने चित्रपटाच्या दिग्दर्शकासोबतही फोटो शेअर केला आहे. ‘जेव्हा तुमचा जुना मित्र चित्रपटाचे दिग्दर्शन करतो आणि तुम्हाला त्या चित्रपटात भूमिका साकारण्याची संधी मिळते तेव्हा तुमच्यासाठी ती अभिमानास्पद गोष्ट असते’ असे कॅप्शन दिले आहे.