आज सर्वत्र हिंसेचं थैमान सुरू आहे. रशिया-युक्रेन संघर्ष, इस्रायल-हमास युद्ध गेले बराच काळ सुरू आहे. त्यांत इतर राष्ट्रं मध्यस्थीचे प्रयत्न करताहेत, पण त्यांना यश येत नाहीए. आणि यांच्यापैकी कुणीच माघारीला तयार नाहीए. हजारो लोक या रणधुमाळीत मरण पावताहेत. परंतु कुणालाही त्यांच्या प्राणांची पडलेली नाहीए. जगात शांतता नांदावी म्हणून संयुक्त राष्ट्र संघ स्थापन केला गेला असला तरी त्याच्या शब्दाला काडीइतकीही आज किंमत उरलेली नाही. बळी तो कान पिळी हेच तत्त्व सर्वत्र सक्रीय असताना दिसते आहे.

याचा अर्थ गौतम बुद्धांसह अनेक धर्मसंस्थापकांनी, महात्मा गांधींसारख्या महामानवाने दिलेला शांतीचा संदेश आज कुणाच्या खिजगणतीतही नाही? स्वा. विनायक दामोदर सावरकर यांनी ‘संगीत संन्यस्त खड्ग’ या नाटकात दिलेला ‘शस्त्रसज्जतेनेच शांती शक्य आहे’ हा संदेशच काळाच्या कसोटीवर योग्य ठरू पाहतो आहे का, असा प्रश्न पडावा अशी आजची स्थिती आहे. अशा या वातावरणात सावरकर दर्शन प्रतिष्ठान आणि नाट्यसंपदा कला मंच यांनी ‘संगीत संन्यस्त खड्ग’ हे नाटक रंगमंचावर आणलं आहे.

अहिंसा ही कितीही चांगली गोष्ट असली तरीही प्रत्येक मनुुष्यमात्राने तिचा स्वीकार केला तरच जगात शांतता नांदू शकते, अन्यथा नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आणि हेच या नाटकात सावरकरांना दाखवायचं आहे. १९३१ साली- म्हणजे ९४ वर्षांपूर्वी हे नाटक लिहिलं गेलं आणि त्याच साली

बळवंत संगीत मंडळींनी ते रंगमंचावर सादर केलं. सावरकरांनी अहिंसा, जन्म-मृत्यू, मोक्ष वगैरेची चर्चा यानिमित्ताने या नाटकात केली आहे.

याकरता बौद्धकाळाची पार्श्वभूमी त्यांनी घेतली आहे. शाक्यराज्याचा त्याग करून गौतम बुद्धाने बौद्ध धर्माची स्थापना केली. अहिंसा हे या धर्माचं महत्त्वाचं तत्त्व. आपल्या या तत्त्वाचा प्रचार, प्रसार करून जगात शांतता आणि स्थैर्य नांदावे म्हणून ते प्रयत्नशील असतात. कौशल, मगध राजांनी बौद्ध तत्त्वज्ञान स्वीकारून अहिंसेला समर्थन दिलं. आपल्या जन्मभूमीने- म्हणजे शाक्यराज्यानेही बौद्ध तत्त्वज्ञानाचा स्वीकार केल्यास भारतभूमीत शांती नांदेल असं गौतम बुद्धांना वाटतं. ते त्यासाठी निकराचे प्रयत्न करतात.

बौद्धांचं तत्त्वज्ञान बुद्धीला पटत नसूनही शाक्य सेनापती विक्रमसिंह केवळ बुद्धांच्या महत्तेचा स्वीकार करून बौद्ध धर्मात प्रवेश करतो आणि संन्यस्त जीवन स्वीकारतो. शाक्य प्रजाही बुद्ध तत्त्वज्ञान अंगीकारते. परंतु कौसल देशाचा नवा राजा शाक्य राज्यावर आक्रमण करतो आणि ते आपल्या अंकित व्हावे म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. शाक्य प्रजेने बौद्ध तत्त्वज्ञान स्वीकारले असल्याने ती आपल्या संरक्षणात गाफील राहते. तरीही सेनापती विक्रमसिंहाचा पुत्र वल्लभ आणि त्याची पत्नी सुलोचना शाक्य राज्य परकीय आक्रमणापासून वाचावे म्हणून प्रयत्नांची शर्थ करतात.

आपल्या राज्यावर संकट कोसळलेलं असताना आपण संन्यासाश्रमात मग्न राहावं हे विक्रमसिंहाला पटत नाही. तो रणांगणात उतरण्यासाठी बुद्धांची आज्ञा मागतो. परंतु एकदा संन्यास आणि अहिंसेचा स्वीकार केल्यानंतर मी आपणास युद्धास संमती देऊ शकत नाही असं गौतम बुद्ध विक्रमसिंहाला सांगतात. विक्रमसिंहातील विजीगिषु सेनानी संन्यासीवस्त्रं उतरवून हातात खड्ग घेण्यास बाध्य होतो. ते संन्यासाचा त्याग करून रणात उतरतात. परंतु तोवर उशीर झालेला असतो… मात्र, शस्त्रसक्षमतेशिवाय शांती अशक्य आहे हे विक्रमसिंहाचे म्हणणे खरे ठरते.

सावरकरांना गांधीजींचं अहिंसेचं तत्त्वज्ञान मान्य नव्हतं. रणाविना स्वातंत्र्य कुणा मिळाले, असं त्यांचं मत होतं. आणि त्याच्या प्रतिपादनार्थच त्यांनी ‘संगीत संन्यस्त खड्ग’ हे नाटक लिहिलं. त्याकाळी सशस्त्र क्रांतीवर विश्वास असणारे आणि अहिंसेचे पुजारी असे स्वातंत्र्य चळवळीत दोन तट पडले होते. आणि आपापल्या मतांवर ते ठाम होते. दोघांचं ध्येय जरी एकच असलं तरी मार्ग वेगळे होते. मात्र, भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सशस्त्र क्रांतीला फारसं पाठबळ मिळालं नाही. मात्र, अहिंसेचं तत्त्वज्ञान मांडणारे गांधीजीही हिंसेला बळी पडले.

या पार्श्वभूमीवर या नाटकाकडे पाहायला हवं. हिंसेने फक्त हिंसाच प्रसवते हे खरं आहे. परंतु अहिंसेने शांतता नांदेल हीसुद्धा एक भ्रामक समजूत आहे हे आजच्या युद्धग्रस्त वातावरणात दिसून येतं. बुद्धांचं आणि गांधीजींचं अहिंसेचं तत्त्वज्ञान हे आदर्शवादी जगाचं स्वप्न आहे. ते मानवी अस्तित्वाचं ईप्सित असायलाच हवं. पण वस्तुस्थिती मात्र तशी नाहीए हे आजचं वास्तव आहे. आज हे नाटक रंगभूमीवर आणण्यात कदाचित या वास्तवाकडेच निर्देश करण्याचा नाटकाच्या कर्त्यांचा हेतू असावा.

सावरकरांचं दीर्घ पल्ल्याचं हे नाटक जसंच्या तसं सादर करणं आजच्या काळात अप्रस्तुत ठरलं असतं. म्हणूनच हृषिकेश जोशी यांनी त्याची रंगावृत्ती तयार करून ते दिग्दर्शित केलं आहे. एकीकडे बुद्धकाळ मंचित करीत असताना त्याकाळचं सामान्य जीवन कसं होतं हेही शाकंभटाच्या रूपात या नाटकात मांडलेलं आहे.

नाटकात बुद्धकाळ आणि तत्कालीन जीवन याचं यथातथ्य दर्शन नाटकात घडतं. बुद्धांचं जीवनदर्शन घडवत असतानाच त्यांच्या तत्त्वज्ञानातील त्रुटींवरही नाटकात भाष्य केलेलं आहे. त्याकरता शाकंभट आणि सेनापती विक्रमसिंहांची योजना केलेली आहे. या अर्थानं हे तत्त्वचर्चात्मक नाटक आहे. ही चर्चा दिग्दर्शकानं पात्रांच्या वागण्या-बोलण्यातून घडविली आहे… प्रसंगरेखाटनातून सादर केली आहे.

राष्ट्रवादाची बीजं त्यात आढळतात. उदात्त, उन्नत मानवी मूल्यंही या नाटकात वल्लभ आणि सुलोचना या पात्रांच्या योजनेतून लेखक सावरकरांनी पेरली आहेत. त्याकाळच्या संगीत नाटकांप्रमाणे पदांचा वापरही चपखल. ‘शतजन्म शोधिताना’ आणि ‘मर्मबंधातली ठेव ही’सारखी पदं नाटक प्रवाही ठेवण्यास उपयुक्त ठरतात. दिग्दर्शकाने मूळ संहितेतला मथितार्थ नाटकात उतरेल असं पाहिलं आहे. त्याकरता चपखल पात्रयोजना केली आहे. दृक्-श्राव्यतेचा विचारही सादरीकरणात जाणवतो. विशेषत: प्रसंगबांधणीत हे आकृृतिबंध खास जाणवतात.

संदेश बेन्द्रे यांनी स्तरीय तसंच सांकेतिक नेपथ्यातून तो काळ उभा केला आहे. कौशल इनामदार यांनी पार्श्वसंगीतातून युद्धकाळ तसंच बौद्धधम्माचं वातावरण समूर्त केलं आहे. अमोघ फडके यांच्या प्रकाशयोजनेत दृक-श्राव्य-काव्याची अनुभूती मिळते. सोनिया परचुरे यांच्या नृत्यआरेखनात नाटकाचं प्रवाहीपण जपलं आहे. मयूरा रानडे यांची वेशभूषा आणि राजेश परब यांची रंगभूषा काळाचे संदर्भ जिवंत करतात. सुधीर कांबळे यांची युद्धतंत्र आखणी प्रत्यक्ष युद्धाची प्रचीती देणारी. सुशील गद्रे यांची ऑर्गनसाथ आणि अथर्व आठल्ये यांची तबलासाथ पदांमध्ये जान ओतते.

ओंकार कुळकर्णी यांनी भगवान बुद्धांचा वैचारिक ठामपणा आणि आचार-विहार भारदस्तपणे व्यक्त केला आहे. ऋत्विज कुलकर्णी यांनी सेनापती विक्रमसिंहची बुद्धिगम्य वैचारिक बैठक तसंच संन्यासाश्रमात शाक्यराज्यावर झालेल्या आक्रमणाची बातमी कळल्यावरची त्यांची विलक्षण तडफड उत्कटतेेनं दाखवली आहे. केतकी चैतन्य यांनी सुलोचनेच्या रूपात अभिसारिका आणि राष्ट्रप्रेमानं पेटून उठलेली सैनिक तडफेनं साकारली आहे.

हृषिकेश जोशी यांचा शाकंभट चलाख, कामचुकार आणि आपमतलबीपणाचा नमुना वाटतो. त्यांचे नाकातले बोलणे विनोदाचा विरंगुळा पुरवणारे. मयूरा रानडे यांनी शाकंभटाची तिखट बायको क्षारा झणक्यात वठवलीय… आणि नलिनीही यथातथ्य. ओमप्रकाश शिंदे यांचा वल्लभ तडफदार. आशीष वझे यांनी राजे शुद्धोधन आणि विद्याुतगर्भ यांच्यातला भेद जाणकारीनं दाखवलाय. याखेरीज शंतनू अंबाडेकर, प्रद्याुम्न गायकवाड, निरंजन जाविर, श्रीराम लोखंडे, गौरव निमकर आणि परमा गुट्टे यांनीही आपापल्या भूमिकांना न्याय दिला आहे. हिसा-अहिंसेच्या तत्त्वज्ञानातील लाभ-हानीचा लेखाजोखा मांडणारं हे नाटक आजच्या काळाचंही दिशादिग्दर्शन करतं यात शंका नाही.