दाक्षिणात्या चित्रपटांना हिंदी बॉक्स ऑफिसवर उत्तम प्रतिसाद मिळतो हे आपण याआधीही अनुभवलं आहे. ‘पुष्षा’, ‘केजीएफ’ सारखे चित्रपट याचं उत्तम उदाहरण आहेत. आता आणखी एक दाक्षिणात्य चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. अभिनेता रिषभ शेट्टीची मुख्य भूमिका असलेला ‘कांतारा’ चित्रपट ३० सप्टेंबरला कन्नड व मल्याळममध्ये प्रदर्शित झाला. तर १४ ऑक्टोबरला हा चित्रपट हिंदीमध्ये प्रदर्शित झाला. आतापर्यंत या चित्रपटाने जगभरात २४३ कोटी रुपये कमाई केली आहे. आता या चित्रपटाबाबत एक नवी माहिती समोर आली आहे.

आणखी वाचा – अक्षय कुमारच्या ‘राम सेतु’कडे प्रेक्षकांची पाठ, चित्रपटासाठी कोट्यवधींचा खर्च करूनही हाती निराशा

‘कांतारा’ला मिळालेलं यश पाहता रिषभच्या कामाचं दिग्गज अभिनेत्यांनी कौतुक केलं. इतकंच नव्हे तर या चित्रपटाने ‘केजीएफ चॅप्‍टर 2’, ‘आरआरआर’ चित्रपटांना मागे टाकलं आहे. रजनिकांत यांनीही या चित्रपटाचं तोंडभरून कौतुक केलं. अनेक दिग्गज कलाकारांनीही हा चित्रपट पाहिला आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘कांतारा’ चित्रपट पाहणार असल्याची चर्चा आहे.

लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी ‘कांतारा’चं खास स्क्रिनिंग आयोजित करण्यात येणार आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार रिषभच या स्पेशल स्क्रिनिंगचं आयोजन करणार आहे. पण याबाबत अजूनही रिषभने कोणतीच अधिकृत घोषणा केलेली नाही.

आणखी वाचा – ‘कांतारा’ भारतातील नंबर वन चित्रपट! ‘KGF 2’, ‘RRR’ पेक्षाही ठरला सरस

१४ नोव्हेंबरला नरेंद्र मोदी यांच्यासाठी हे खास स्क्रिनिंग आयोजित करण्यात आलं असल्याची चर्चा आहे. यावेळी या चित्रपटाच्या प्रॉडक्शन हाऊसचेही काही लोक उपस्थित असणार आहेत. रजनीकांत यांनीही हा चित्रपट पाहिला आहे. ‘कांतारा’ पाहिल्यानंतर अंगावर काटा आला असं त्यांनी म्हटलं होतं.