गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवरच येऊ घातला आहे. संपूर्ण देशासह मुंबई आणि महाराष्ट्रात या उत्सवाचा एकच कल्ला असतो. ११ दिवसांच्या उत्सवामध्ये सर्वांचाच उत्साह अगदी ओसंडून वाहत असतो. गणेश चतुर्थीच्या याच पार्श्वभूमीवर ‘स्टार प्रवाह’, ‘मुंबई फिल्म कंपनी’ आणि बॉलिवूडमधला मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख यांनी एकत्र येत एक व्हिडिओ प्रदर्शित केला आहे. ‘थॅंक गॉड बाप्पा’ असे बोल असणाऱ्या गाण्याच्या या व्हिडिओला रितेश त्याच्या अंदाजात सादर करताना दिसतोय. रितेशने स्वत:च हे गाणे गायले असून गणेशोत्सवाच्या बदलत्या रुपावर या गाण्यातून उपरोधिकपणे भाष्य करण्यात आले आहे.
समाजानेच स्वत:चे असे काही नियम बनवत उत्सवांचाही व्यवसाय केला आहे असे विश्लेषण या व्हिडिओतून पाहायला मिळते. ‘दीड, पाच, अकरा सांगाल तेवढे दिवस बसतो; थॅंक गॉड बाप्पा आपल्यासारखा नसतो’ असे म्हणत रितेशने अनेकांचे लक्ष वेधले आहे. प्रत्येकाने आपल्या सोयीनुसार उत्सवांचा जणू काही बाजारच मांडला आहे. त्यावरच बाप्पाचे हे ‘कूल’ गाणे अनेकांना डोळे उघडायला भाग पाडेल यात काही शंका नाही.
गाणे प्रदर्शित होताच अनेकांनी या गाण्याला पसंती दिली आहे. इतकेच नव्हे तर, ट्विटरवरही #ThankGodBappa ट्रेंडमध्ये आला होता. बाप्पाच्या या हटके ‘रॅप’ गाण्याला अभिनेता अक्षय कुमार, अभिषेक बच्चन यांनीही शेअर केले आहे. रितेशचा हा ‘कूल बाप्पा’ आता कितीजणांना साक्षात्कार देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.