बॉलिवूडसह हॉलिवूडमधील कलाकारही खवय्येप्रेमी आहेत. अनेक हॉलिवूडमधील अभिनेते हे भारतीय जेवणाची प्रशंसा करताना दिसतात. सध्या अनेक हॉलिवूड कलाकारांना भारतीय खाद्यपदार्थांचे वेड लागले आहे. काही महिन्यांपूर्वी पायरेट्स ऑफ द कॅरेबियन चित्रपट अभिनेता जॉनी डेपने भारतीय रेस्टॉरंटमध्ये खाण्याचा आस्वाद घेतला होता. यासाठी त्याने लाखो रुपये खर्च केले होते. यानतंर आता ‘डेडपूल’ फेम रायन रेनॉल्ड्स यानेही भारतीय खाद्यपदार्थाचा आस्वाद घेतला आहे. नुकतंच त्याने याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे.

अ‍ॅक्शन आणि विनोदी संवादांनी खचाखच भरलेला ‘डेडपूल २’ या चित्रपटाने जगभरात धुमाकूळ घातला होता. रायन रेनॉल्ड्सचा उत्तम अभिनय आणि बॉलिवूड स्टार रणवीर सिंगच्या हिंदी डबिंगमुळे भारतातही या चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. रायन रेनॉल्ड्स हा सध्या इंग्लंडमध्ये वास्तव्यास आहे. तो व्हेक्सहॅम ए.एफ.सी. या फुटबॉल संघाचा मालक आहे. रायन हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. त्याचा भारतात खूप मोठा चाहता वर्ग आहे. नुकतंच त्याने परदेशातील एका भारतीय हॉटेलमधील खाद्यपदार्थाचा आस्वाद घेतल्याचे सांगितले आहे.

रायन रेनॉल्ड्सने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. यात त्याने लाईट ऑफ इंडिया या हॉटेलचे नाव असलेले एक पत्रक शेअर केले आहे. या हॉटेलमधून त्याने खाण्यासाठी काही तरी पदार्थ ऑर्डर केले होते. त्यानंतर त्याने त्या हॉटेलमधील जेवणाची प्रशंसा केली आहे. “युरोपमधील सर्वोत्कृष्ट भारतीय फूड” अशी पोस्ट त्याने केली आहे.

रायन रेनॉल्ड्सच्या पोस्टनंतर अनेकांनी त्या ‘लाईट ऑफ इंडिया’ हॉटेलबाहेर गर्दी केली आहे. हे हॉटेल इंग्लंडमधील चेसीयर टाऊन परिसरात स्थित आहे. हे भारतीय हॉटेल रझिया रहमान आणि त्यांचे पती चालवतात. १९८० मध्ये सुरू झालेले हे हॉटेल रहमान कुटुंब सांभाळत आहे. रझीया यांचा मुलगा शा रहमान देखील या व्यवसायामध्ये सहभागी झाला आहे. त्यापुढे ते म्हणाले, रायन या हॉटेलमध्ये कधी आला आहे, असे मला तरी आठवत नाही. तसेच माझ्या आई-वडिलांनाही याबाबतचा अंदाज नाही. त्यामुळे हे जेवण त्याच्या कोणीतरी सहकाऱ्यांनी ऑर्डर केल्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रेनॉल्डच्या त्या पोस्टनंतर आमच्या हॉटेलमधील गर्दी अचानक वाढू लागली. अनेकजण फोन करुन जेवणाची ऑर्डर देत आहे. आम्ही रायन रेनॉल्ड्सचे खूप आभारी आहोत. त्याच्या या पोस्टमुळे आम्हाला फार फायदा झाला आहे. त्याचे आभार मानन्यासाठी आम्ही लवकरच डेडपूल मसाला हा नवीन पदार्थ सुरु करणार आहोत. तो पदार्थ नेमका काय असेल, किती रुपयांना असेल याबद्दल आम्ही नक्कीच जाहीर करु, असे या हॉटेलच्या मालकांनी सांगितले.