‘बाहुबली २ द कन्क्लुजन’च्या अभूतपूर्व यशानंतर टॉलिवूड अभिनेता प्रभास सुजिथ रेड्डीच्या ‘साहो’ चित्रपटात झळकणार आहे. जूनमध्ये चित्रीकरणाला सुरुवात होणाऱ्या या चित्रपटाबद्दल सध्या बऱ्याच चर्चा सुरु आहेत. प्रभाससोबत यात कोणती अभिनेत्री झळकणार हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. दरम्यान, या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच ३५० कोटी रुपये कमविल्याचे कळते.
‘बिहाइंड वूड्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘साहो’ चित्रपटाचे वितरण अधिकार विकून निर्मात्यांनी ३५० कोटी रुपये कमविले आहेत. एका प्रसिद्ध बॉलिवूड प्रॉडक्शन कंपनीने हे वितरण अधिकार विकत घेतल्याचे समजते. ‘बाहुबली’च्या दोन्ही हिंदी व्हर्जन चित्रपटांचे वितरण करणाऱ्या करण जोहरनेच कदाचित ‘साहो’चेही अधिकार विकत घेतल्याची शक्यता आहे.
युव्ही क्रिएशनच्या निर्मिती अंतर्गत बनणाऱ्या ‘साहो’ चित्रपटाचा बजेट तब्बल १५० कोटी रुपयांचा असल्याचे म्हटले जातेय. वर्षाअखेरपर्यंत प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटासाठी बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक शंकर-एहसान-लॉय हे त्रिकूट संगीत देणार आहे. तेलगु, तमिळ आणि हिंदी या तीन भाषांमध्ये ‘साहो’ प्रदर्शित करण्यात येईल. प्रभासच्या या चित्रपटासाठी बॉलिवूड अभिनेत्रीला घेण्याचा निर्मात्यांचा मानस होता. त्यासाठी त्यांनी कतरिना कैफ, श्रद्धा कपूर, दिशा पटानी आणि पूजा हेगडे यांसारखी मोठी नाव समोर ठेवली होती. मात्र, या अभिनेत्रींच्या मानधनाचा आकडा बराच मोठा असल्याने प्रभास असताना अशा अभिनेत्रींची गरज नाही, असे निर्मात्यांचे म्हणणे आहे. चित्रपटातील मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी आता ‘बाहुबली’ फेम अनुष्का शेट्टीचे नाव घेतले जात असून, त्याबद्दल कोणतेही अधिकृत वृत्त अद्याप समोर आलेले नाही.
दरम्यान, एसएस राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली २’ ने १५०० कोटी रुपयांची बक्कळ कमाई केली आहे. आजवर कोणत्याच भारतीय चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १५०० कोटींची कमाई केलेली नाही.