‘क्रिकेट खेळायला लागल्यापासून विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न मी पाहिलं होतं. ते स्वप्न पूर्ण व्हायला २२ वर्षांची तपश्चर्या मला करावी लागली. माझ्या हातात विश्वचषक आला तो माझ्यासाठी आयुष्यातील अमूल्य क्षण होता!!’ या शब्दांत सचिन तेंडुलकरने आपल्या आयुष्यातील काही महत्त्वाचे क्षण सांगत अनेक आठवणींना उजाळा दिला. निमित्त होते, ‘‘चला हवा येऊ द्या’’ च्या मास्टर ब्लास्टर विशेष भागाचे!! ‘चला हवा येऊ द्या’ च्या आगामी भागात क्रिकेट जगतातील देव म्हणजेच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आला होता. या भागात ‘भारतरत्न’ सचिनने आपल्या क्रिकेट कारकिर्दीबरोबरच व्यक्तिगत आयुष्यातील अनेक गोष्टींबाबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. गप्पांची ही अनोखी मैफिल २२- २३ मे रोजी सोमवार आणि मंगळवारच्या भागात रसिकांना अनुभवता येणार आहे.

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाची भुरळ मराठी मनोरंजनसृष्टी इतकीच बॉलिवूडलाही पडली. आमिर खान, सलमान, शाहरुख, रितेश देशमुख, इरफान खान, जॉन अब्राहम, रविना, नाना पाटेकर, विद्या बालन हे ‘चला हवा येऊ द्या’चे जबरदस्त फॅन झाले. आता त्यांच्या प्रमाणेच ‘चला हवा येऊ द्या’ च्या चाहत्या वर्गात क्रिकेट रसिकांच्या गळ्यातला ताईत मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरही दाखल झाला आहे.

sachin-tendulkar-chala-hawa-yeu-dya-1

कार्यक्रमाच्या सेटवर सचिनचे आगमन होताच रसिकांनी ‘सचिन सचिन’ अशा आरोळ्यांनी सभागृह दणाणून सोडला. या भारावलेल्या वातावरणात सचिन तेंडुलकरशी गप्पांची मैफल निलेश साबळे याने रंगवली. निलेशच्या सगळ्या प्रश्नांवर सचिनने तुफान फटकेबाजी केली आणि अवघे सभागृह मंत्रमुग्ध झाले. या अद्भूत गप्पांमध्ये आपल्या कुटुंबाविषयी, गुरूंविषयी तसेच सहकाऱ्यांबाबत सचिन भरभरून बोलला. ‘वयाच्या ११ व्या वर्षी मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि खेळासाठी १२ व्या वर्षापासून घरापासून दूर राहू लागलो. या दरम्यान घरच्यांबरोबरचे अनेक क्षण मी ‘मिस’ केलेत. पण त्याची तक्रार मी कधी करणार नाही कारण क्रिकेट ही माझी निवड होती. त्यामुळे, क्रिकेटसाठी अनेक गोष्टींचा मला त्याग करावा लागला असं लोक म्हणतात. मी त्याला त्याग वगैरे म्हणणार नाही. ते माझं आयुष्य होतं. मी स्वप्नांचा पाठलाग करत होतो …. ती स्वप्नं पूर्ण करण्यासाठी मला जे करता आलं ते सगळं मी केलं!’, असं सचिन म्हणला. सचिनसोबत त्याची पत्नी अंजली, भाऊ नितीन तेंडुलकर, अजित तेंडुलकर, बहीण सविता तेंडुलकर, तसेच त्याचे मित्र अतुल रानडे, जगदीश चव्हाण आणि अजित भुरे हेही ‘चला हवा येऊ द्या’ च्या सेटवर आवर्जून हजर होते.

सचिनच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे क्षण चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर लवकरच अवतरणार असून क्रिकेट शौकिनांसाठी ही खूप आनंदाची बाब आहे. ‘सचिनः अ बिलियन ड्रीम्स’ चित्रपट ही आपल्या आयुष्यातली आणखी एक महत्त्वाची खेळी आहे, असं सांगत ही खेळी आपण आपल्या आई-बाबांना समर्पित करणार असल्याचं सचिनने सांगितलं. ‘सचिनः अ बिलियन ड्रीम्स’ मध्ये साहित्य सहवास ते शिवाजी पार्क मैदान आणि शारदाश्रम शाळा ते भारतरत्न हा सर्वोच्च किताब स्वीकारतानाचा त्याचा प्रवास उलगडला आहे. त्याच रोमहर्षक प्रवासाची झलक त्यानं ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये मारलेल्या या खास दिलखुलास गप्पांमधून उलगडत गेली.

‘सचिन सचिन’ हा जयघोष माझ्या निवृत्तीनंतरही सुरूच राहील, अशी कल्पनाही मी कधी केली नव्हती. पण आता तो थिएटरमध्येही घुमणार आहे. मला खरंच खूप आनंद होतोय, अशा भावनाही त्यानं व्यक्त केल्या. तर ‘आजवर अनेक मान्यवर चला हवा येऊ द्याच्या मंचावर येऊन गेले. पण आज क्रिकेट क्षेत्राचे दैवत सचिन तेंडुलकर या मंचावर आले हा क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात भाग्याचा दिवस आहे असे मी म्हणेन”, अशा शब्दात निलेश साबळे याने आपल्या भावना व्यक्त केल्या.