फुलराणी सायना नेहवालचा बायोपिक गेल्या दोन वर्षांपासून चर्चेत आहेत. पण अजूनपर्यंत या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरूवात झालेली नाही. याचं मुख्य कारण आहे ते म्हणजे सायना नेहवालला श्रद्धामध्ये हवं असलेलं परफेक्शन. सायना बॅडमिंटनच्या कोर्टवर जेवढी अस्खलित खेळते तेवढंच श्रद्धानेही सिनेमात खेळावं अशी तिची इच्छा आहे. यामुळेच सायनाने दिग्दर्शक अमोल गुप्ते यांना सांगितले की, जोवर श्रद्धा खेळात निपुण होत नाही तोवर सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरूवात करु नये.

saina, shraddha
सायना नेहवाल, श्रद्धा कपूर

श्रद्धासाठी सायनाची व्यक्तिरेखा साकारणं फारच कठीण गोष्ट आहे. बॅडमिंटनचा सराव करताना तिला अनेकदा दुखावतीचा सामनाही करावा लागला आहे. शिवाय सिनेमाचे चित्रीकरण सुरू होत नव्हते म्हणून श्रद्धाने दरम्यानच्या काळात ‘हसीना’ सिनेमाचे चित्रीकरण केले. तसेच आता ती ‘बाहुबली’ स्टार प्रभाससोबत तीन भाषांमध्ये चित्रीत केल्या जाणाऱ्या ‘साहो’ सिनेमातही झळकणार आहे.

सायनाचा खेळात निपुण होण्याचा निश्चय पाहून श्रद्धानेही तिच्या अपेक्षांवर खरं उतरण्याचा निर्णय घेतला आहे. श्रद्धा सध्या सायनाच्या देहबोलीचा अभ्यास करत आहे. याबद्दल बोलताना सायना म्हणाली की, ‘कोणत्याही खेळांडूची सिनेमात व्यक्तिरेखा साकारणं सोप्पी गोष्ट नाही. खेळाडुंचं आयुष्यच पूर्ण वेगळं असतं. त्याच्यासारखं वागणं खूप कठीण असतं.’

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धाने बँडमिंटनच्या तयारीसाठी एका प्रशिक्षकाची नेमणुक केली आहे. तसेच सायनाही तिला सरावात मदत करते. सायनाने दिग्दर्शक अमोल गुप्ते यांना स्पष्ट सांगितले की, जोवर तिला श्रद्धाच्या खेळात तिची झलक दिसत नाही तोवर सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरूवात करायची नाही. पण एकीकडे श्रद्धाचे इतर सिनेमांचे चित्रीकरण पाहता येत्या वर्षाअखेरपर्यंत सायना नेहवालच्या बायोपिकच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार नाही असेच म्हणावे लागेल.