महाराष्ट्रातील एका सर्वसामान्य गावातील अतिसामान्य कुटुंबातला एक मुलगा आज इतकी उंची गाठेल, अशी कोणाला पुसटशी कल्पना नव्हती. पण, नागराज मंजुळे नावाच्या एका पट्टीच्या दिग्दर्शकानं आकाश ठोसरच्या रुपात एक नवा आणि रांगड्या मातीतील अभिनेता हुडकलाच. ‘सैराट’ या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु ही नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आणत मंजुळेंनी त्याच्या दिग्दर्शनाचा आणखी एक पैलू प्रेक्षकांपुढे सादर केला. ‘ए परश्या…….’ असं म्हणत धावत येणारा परश्याचा मित्र आणि त्या मित्राच्या एका हाकेवर होडीतून उडी मारणारा परश्या म्हणजेच आकाश ठोसर त्याच्या पदार्पणच्या चित्रपटातूनच प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहिला.

‘सैराट’ प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटातील प्रत्येक पात्र प्रकाशझोतात आलं. त्यासोबतच प्रकाशझोतात आला आकाश ठोसर. त्याच्या नुसत्या हसण्यानं अनेक तरुणी त्याच्यावर भाळल्या. आकाशच्या प्रेक्षक वर्गाकडे पाहिलं असता लक्षात येतं की त्याच्या ग्रामीण असण्यावर अगदी शहरी मुलींनीही नाकं मुरडली नाहीत. त्यामुळे कलाकारांना प्रेक्षकांचं प्रेम मिळायचं ते मिळतंच यावर पुन्हा एकदा विश्वास बसला. कलाकारांना मिळणाऱ्या प्रेमासाठी शहरी आणि ग्रामीण असे काही निकष नसतातच मुळी.

महेश मांजरेकरांच्या आगामी ‘एफयू’ या चित्रपटातून आकाश प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. एका सर्वसामान्य गावातून आलेल्या आकाशला मिळालेली प्रसिद्धी आणि त्या प्रसिद्धीच्या रुपात त्याला झालेला फायदा याविषयीसुद्धा तो नेहमीच माध्यमांसमोर दिलखुलासपणे बोलला. एका सामान्य मुलाची स्वप्न असतात त्याचप्रमाणे उराशी स्वप्न कवटाळून ती पूर्णत्त्वास नेण्यासाठी मेहनत घेत, नागराज मंजुळे म्हणजे ‘अण्णा’च्या साथीने त्याने हे यश संपादन केलं आहे.

आकाशच्या आतापर्यंतच्या कारकीर्दीविषयी सांगायचे झाले तर नाना पाटेकर आणि अंकुश चौधरी या आपल्या आवडीच्या अभिनेत्यांची भेट घेण्याचं स्वप्न त्याने पाहिलं होतं. त्याचं हे स्वप्न तर खरं झालं असणार यात शंकाच नाही. सध्या आकाश ठोसर हे नाव सोशल मीडियावरही चर्चेत आहे. आकाशने औंधमधील एसएसव्हीएम शाळेतून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याने पुण्याच्या विद्यापीठातून पदवी शिक्षण घेतले. नागराजने सर्वप्रथम आकाशचे सहकलाकाराच्या भूमिकेसाठी ऑडिशन घेतले होते. पण आकाशच्या अभिनयाने प्रभावित होऊन त्यानंतर त्याला मुख्य भूमिकेसाठी घेण्यात आले. ‘सैराट’साठी आकाशने आठवड्याभरात चार तर महिनाभरात तेरा किलो वजन कमी केले होते.

वाचा: #SairatMania : महाराष्ट्रातनं थेट कर्नाटकात… ते बी एकटीच!

रांगड्या मातीत मर्दानी खेळ करणारा हा कुस्तीपटू कधी एक अभिनेता म्हणून नावारुपास आला हे कळलेसुद्धा नाही. आकाशचा चित्रपटसृष्टीतील प्रवास अनेकांना हेवा वाटेल असाच आहे. जागतिक पातळीवरही ज्या चित्रपटाने अनेकांनाच ‘याड’ लावलं अशा चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत झळकलेल्या आकाशने तुम्हालाही ‘याड लावलं ना…?’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाचा: #SairatMania : अन् ‘उबर’चा मेसेज आला ‘मंग्या ऑन द वे….’