राज्यात करोना संसर्ग अधिकच झपाट्याने वाढत आहे. दररोज मोठ्या संख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत असून, मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडत आहे. अगदी सर्वसामान्य नागरिकांपासून ते दिग्गजांपर्यंत सर्वचजण करोनाच्या विळख्यात सापडत आहेत. आता प्रसिद्ध गायक, लेखक व संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

सलील यांनी करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे ट्वीट करत सांगितले आहे. ‘सर्वतोपरी काळजी घेऊनही आज माझी कोविड-१९ चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. घरीच क्वारन्टाइन करून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व औषधे सुरू केली आहेत. गेल्या एका आठवड्यात मला भेटलेल्या व्यक्तींना याची कल्पना असावी या दृष्टीने हे ट्वीट केले’ असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी मराठी चित्रपटसृष्टीतील सगळ्यांची लाडकी जोडी उमेश कामत आणि प्रिया बापट यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. आता त्यांच्या पाठोपाठ सलील कुलकर्णी यांची करोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे.

दररोज मोठ्यासंख्येने रूग्ण आढळून येत असल्यामुळे राज्य सरकारने कडक निर्बंध लागू करत, राज्यात रात्रीची संचारबंदी देखील घोषित केलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउनचे देखील संकेत दिलेले आहेत. आज दिवसभरात राज्यात ३१ हजार ६४३ नवीन करोनाबाधित आढळले असून, १०२ रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर आता १.९८ टक्के इतका आहे. राज्यात आज रोजी एकूण ३,३६,५८४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.