सलमान आणि त्याचे लग्न हा जणू काही एकच प्रश्न बॉलिवूडमध्ये असल्याचे चित्र गेले काही दिवस सुरू आहे. त्यामुळे सलमानच्या लग्नाची चर्चा बॉलिवूडमध्येच नाही तर त्याच्या तमाम चाहत्यांमध्ये सुरू आहे. पण आता या चर्चेला लवकरच पूर्णविराम मिळणार आहे. कारण सलमान खानने स्वत: त्याच्या लग्नाची तारीख जाहीर केली आहे. ‘मी १८ नोव्हेंबरला लग्न करणार’ असल्याचे सलमानने जाहीर केले आहे.
भारताची प्रसिद्ध टेनिसपटू सानिया मिर्झा हिच्या आत्मचरित्राच्या प्रकाशन कार्यक्रमाला सलमान आला होता. त्यावेळी सानिया मिर्झाने ‘तू लग्न कधी करणार आहेस? असा प्रश्न त्याला विचारला. सानियाच्या प्रश्नावर सलमान गोंधळला खरा पण एव्हाना सलमानला हा प्रश्न इतक्या जणांनी विचारून झाला आहे की अशा प्रश्नांना बगल कशी द्यायची हे सलमानला चांगलच ठाऊक आहे.
त्यामुळे ‘मी १८ नोव्हेंबरलाच लग्न करणार’ असे सलमानने जाहीर केले. पण वाचकांना हेही लक्षात आले असेल की जरी सलमान खानने १८ ही तारिख जाहीर करून वेळ मारून नेली असली तरी बोहल्यावर चढण्यासाठी कोणते वर्ष उजाडणार हे मात्र त्याने सांगितले नाही.
१८ नोव्हेंबरलाच सलमानचे वडील विवाहबद्ध झाले होते. सलमानची बहिण अर्पिता हिने देखील याच तारखेला लग्न केले होते.