बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा आगामी चित्रपट ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या सलमान खान आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर हे चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहेत. दरम्यान, एका मुलाखतीमध्ये सलमानने नव्या कलाकारांना सल्ला दिला आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सलमानला OTT मुळे हिंदी चित्रपटसृष्टीमधील स्टारडम संपुष्टात येईल का? असे विचारण्यात आले होते. त्यावर त्याने ‘आम्ही जाऊ आणि दुसरं कुणीतरी येईल. मला वाटत नाही की कलाकारांचे युग निघून जाईल. ते कधीच जाणार नाही. ते कायम त्यांचेच असेल. पण आता ते अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. तुम्ही कोणत्या चित्रपटाची निवड करता, तुम्ही वास्तविक जीवनात काय आहात आणि बऱ्याच काही गोष्टी आहेत. तरुण पिढीचे स्वत:चे सुपरस्टारडम असते’ असे सलमान म्हणाला.
आणखी वाचा : ‘देवमाणूस’ पुन्हा एकदा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

पुढे तो म्हणाला, ‘ही शेवटची पिढी आहे हे मी गेल्या कित्येक वर्षांपासून ऐकत आहे. पण अगदी सहज गोष्टी आम्ही तरुण कलाकारांच्या हातात देत नाही. मेहनत करा भाई, अनेक कलाकार वयाच्या ५०व्या वर्षी देखील मेहनत करत आहेत. त्यामुळे तुम्ही देखील मेहनत करायला हवी.’

‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ चित्रपटामध्ये सलमान खान पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. तर आयुष गँगस्टरची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे शूटिंग १६ नोव्हेंबरपासून सुरू झाले. त्यावेळी फक्त आयुष शुटिंग करत होता. या चित्रपटातून महिमा मकवाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ हा चित्रपट मराठी हिट चित्रपट ‘मुळशी पॅटर्न’चा हिंदी रिमेक आहे.