सलमान खानचा बहुप्रतिक्षित ‘राधे-युवर मोस्ट वॉन्टेड भाईजान’ हा सिनेमात 13 मे ला जगभरातील विविध सिनेमागृहांमध्ये तसचं ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालाय. या सिनेमाला चाहत्यांचा चांगला प्रतिसादही मिळतोय. मात्र सिनेमा रिलीज झाल्यानंतर काही तासातच तो लीक झाला आहे. अनेक वेबसाईटवर राधे फ्रीमध्ये म्हणजेच मोफत पाहू आणि डाउनलोड करू शकतो. सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच सलमान खानने एक व्हिडीओ शेअर करत पायरसीपासून दूर रहा आणि योग्य प्लॅटफॉर्मवर सिनेमा पहा अशी विनंती केली होती.

सलमान खानने बुधवारी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. यात त्याने चाहत्यांकडून कमिंटमेंट मागितली होती. तो म्हणाला होता, ““एक सिनेमा पूर्ण करण्यासाठी अनेक लोक मेहनत करतात. खूप दु:ख होतं जेव्हा लोक पायरसी करून सिनेमा पाहतात. मी तुम्हा सर्वांकडून एक कमिटमेंट मागतो की योग्य प्लॅटफॉर्मवर योग्यरित्या सिनेमा एन्जॉय करा. तर ही आहे प्रेक्षकांची कमिटमेंट..नो पायरसी इन एंटरटेनमेंट” असं तो यात म्हणाला.

मात्र यानंतरही चाहत्यांमी कमिंटमेंट तोडली आहे. हा सिनेमा काही बेकायदेशीर वेबसाईटवर लीक झालाय. तर सलमानच्या काही चाहत्यांनी सोशल मीडियावरून सलमान खान आणि राधेच्या टीमने पायरसी करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

झी5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सलमान खानचा ‘राधे-युवर मोस्ट वॉन्टेड भाईजान’ हा सिनेमा रिलीज करण्यात आलाय. त्यामुळे झी5 वर लाखो चाहत्यांनी गर्दी केली. यामुळे झी5 चा सर्वर क्रॅश झाला. सिनेमा पाहताना तांत्रिक अडचणी येऊ लागल्याने प्रेक्षक संतापले आणि सोशल मीडियावर त्यांनी संताप व्यक्त केला.