‘मेरे बारे मे इतना मत सोचना दिल मे आता हूँ, दिमाग मे नही’, हा संवाद म्हटलं की एकच चेहरा डोळ्यांसमोर येतो, तो चेहरा म्हणजे बॉलिवूडचा ‘सुलतान’ सलमान खानचा. सलमानच्या चाहत्यांसाठी येणारी खुशखबर म्हणजे पुढच्या वर्षीच्या ईदसोबतच ख्रिसमसलाही त्याचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट म्हणजे २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘किक’चा सिक्वल. दिग्दर्शक साजिद नाडियादवालाने ‘किक २’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. २०१९च्या ख्रिसमसला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

‘किक २’ सलमानसोबतच इतर कोणाच्या भूमिका असतील हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच ठेवण्यात आले आहे. पण या सिक्वलमध्ये तो दुहेरी भूमिका साकारणार असल्याचे म्हटले जात आहे. ‘किक’मध्ये सलमानसोबतच जॅकलिन फर्नांडिस, रणदीप हुडा आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. सलमान- जॅकलिनच्या केमिस्ट्रीलाही प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. त्यामुळे आता सिक्वलमध्ये जॅकलिनच नायिका म्हणून झळकणार की दुसरी कोणती अभिनेत्री सलमानसोबत दिसेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढच्या वर्षी ईदच्या मुहूर्तावर अली अब्बास जफर दिग्दर्शित सलमानचा ‘भारत’ हा चित्रपटसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे सलमानच्या चाहत्यांसाठी पुढचे वर्ष धमाकेदार ठरणार हे नक्की!