करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात २१ दिवस लॉकडाउन करण्यात आला आहे. सध्या या लॉकडाउनच्या काळात अत्यावश्यक सेवा सोडल्या तर सारं काही बंद ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे सध्या कलाविश्वातही बंदचं वातावरण आहे. अनेक मालिका, चित्रपट यांचं चित्रीकरण सध्या बंद आहे. मात्र या बंदचा परिणाम रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांवर होत आहे. कलाविश्वात असे अनेक कामगार आहेत जे रोजंदारीवर काम करतायेत. परंतु सध्या सर्वत्र कामकाज बंद असल्यामुळे या कामगारांना आर्थिक संकटांना समोरं जाव लागत आहे. त्यामुळेच अभिनेता सलमान खान याने मदतीचा हात पुढे केला आहे. त्याने आर्थिक संकटात सापडलेल्या  २५ हजार कामगारांना मदत करण्याचा निर्धार केला आहे.

‘इंडिया टुडे’नुसार, लॉकडाउनच्या काळात अनेक कामगार आर्थिक संकटात सापडले आहेत. यापैकी जवळपास २५ हजार डेली वर्कर्सला मदत करण्यासाठी सलमान पुढे सरसावला आहे. त्याने २५ हजार कामगारांना मदत करण्याचा निर्धार केला आहे. विशेष म्हणजे यासाठी त्याने वेस्टर्न इंडियन सिने एम्प्लॉईजसोबत (fwic) चर्चा केली असून सध्या गरजू कामगारांची यादी तयार करण्यात येत आहे. या कामगारांची यादी तयार झाल्यानंतर सलमान त्यांना आर्थिक मदत पुरविणार आहे.

वाचा : Coronavirus : कलाकार धावले मदतीला; रंगमंच कामगार संघटनेच्या सहाय्याने करतायेत अशी मदत

दरम्यान, अडीअडचणीच्या काळात सापडलेल्या गरजूंना मदत करण्यासाठी सलमान कायमच पुढे असतो. केरळमध्ये उद्भवलेल्या पूरस्थितीमध्येदेखील सलमानने पूरग्रस्तांना मदत केली होती. त्याने तब्बल १२ कोटी रुपये आर्थिक मदत केली होती. सलमानप्रमाणेच सध्या अनेक सेलिब्रिटी गरजूंना, तसंच करोनाग्रस्त रुग्णांना शक्य तितकी मदत करत आहेत.