अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आजवर तिनं अनेक चित्रपटांतून विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. अशातच नुकतीच समांथाला इंडस्ट्रीत १५ वर्षे पूर्ण झाली आहेत. एका अवॉर्ड सोहळ्यादरम्यान समांथाला इंडस्ट्रीत १५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त केक कापण्यात आला होता. त्यावेळी समांथानं भावूक होत तिच्या भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमादरम्यान संवाद साधताना समांथा म्हणाली, “तेलुगू चित्रपटसृष्टीनं मला खूप काही दिलं आहे. ही माझी कर्मभूमी आहे. त्यामुळे मी कायम तेलुगू प्रेक्षकांना प्राधान्य देऊन त्यांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करेन.” त्यावेळी तिथे उपस्थित अनेकांनी टाळ्या वाजवत तिचं कौतुक केलं. त्यादरम्यानच सुरू असलेल्या अवॉर्ड सोहळ्यात समांथाचा पूर्वपती नागा चैतन्यची सावत्र आई उपस्थित होती. समांथाला इंडस्ट्रीत १५ वर्ष पूर्ण झाल्यानं त्यांनीदेखील टाळ्या वाजवून तिचं कौतुक केल्याचं ‘झी तेलुगू’ने शेअर केलेल्या व्हिडीओमधून पाहायला मिळतं.
समांथानं २०१० साली ‘ये माया चेसावे’ या चित्रपटातून इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. सध्या समांथा दाक्षिणात्य इंडस्ट्रीतली लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. या १५ वर्षांच्या कारकिर्दीत समांथाच्या खासगी जीवनातही महत्त्वाच्या घटना घडल्याचं पाहायला मिळालं. या सर्वांमधून बाहेर येत ती पुन्हा उभी राहिली आणि आता केवळ अभिनयापुरतंच मर्यादित न राहता, तिनं निर्मिती क्षेत्रातही पदार्पण केलं आहे. समांथा गेल्या काही काळात ‘खुशी’, ‘शकुंतलम’, ‘पुष्पा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करताना दिसली आणि लवकरच ती ‘रक्त ब्रह्मांड : द ब्लडी किंग्डम’ यांसारख्या हिंदी चित्रपटांतून बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्यांसह महत्त्वाच्या भूमिकांत झळकणार आहे.
समांथा सध्या ‘सिटाडेल : हनी बनी’चे दिग्दर्शक राज निदिमोरूसह रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरू आहेत. पण, या दोघांनीही अद्याप याबाबत कुठलाही खुलासा केलेला नाही. समांथा राज निदिमोरूबरोबरचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करीत असते. काही दिवसांपूर्वी समांथा राज निदिमोरूसह तिरुपती बालाजी मंदिरात एकत्र दर्शनासाठी गेल्याचंही पाहायला मिळालं होतं.